नवी दिल्ली.
Brijbhushan's innocent freedom भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी ब्रिजभूषण शरण सिंग आणि महासंघाचे माजी सहायक सचिव विनोद तोमर या दोघांचीही निर्दोष मुक्तता केली. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारींवरून २०२३ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला.ब्रिजभूषण शरण सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना अनेक महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी २०२३ मध्ये लैंगिक छळ, महिलांवर गुन्हेगारी बळाचा वापर तसेच गुन्हेगारी धमकी यांसह विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात विनोद तोमर यांनाही सहआरोपी करण्यात आले होते.
या खटल्यातील अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने ३ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्याचे निश्चित केले होते. अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी (ACJM) अश्वनी पनवार यांच्या न्यायालयात बंद खोलीत (इन-कॅमेरा) सुनावणी झाली. फिर्यादी आणि बचाव पक्षाचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यापूर्वी निकाल राखून ठेवला होता. तसेच दोन्ही पक्षांना दोन आठवड्यांच्या आत लेखी निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले होते. फिर्यादींच्या वतीने ज्येष्ठ वकील रेबेका जॉन यांनी बाजू मांडली, तर बचाव पक्षाचे नेतृत्व वकील राजीव मोहन यांनी केले. त्यांच्या पथकात रेहान खान आणि ऋषभ भाटी यांचाही समावेश होता. बचाव पक्षाने ३० जून रोजी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला होता. हे प्रकरण जंतर-मंतर येथे महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनानंतर विशेष चर्चेत आले होते.
आंदोलनादरम्यान ब्रिजभूषण शरण सिंग यांनी महासंघाचे अध्यक्ष असताना लैंगिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी १५ जून २०२३ रोजी तब्बल १,५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या आरोपपत्रात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५४, ३५४अ, ३५४ड आणि ५०६(१) अंतर्गत गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान १२ मे रोजी न्यायालयाने विशेष तपास पथकाच्या (SIT) एका सदस्यासह तपास अधिकाऱ्याचा जबाबही नोंदवला होता. भारतातील तसेच परदेशातील काही महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांच्या आधारे हा खटला न्यायालयात सुरू होता.निर्णयानंत प्रतिक्रिया देताना ब्रिजभूषण शरण सिंग म्हणाले, "माझा पहिला जबाब नोंदवला गेला तेव्हाच मी सांगितले होते की, माझ्यावरील एक जरी आरोप सिद्ध झाला तर मी आत्महत्या करेन. आज न्यायालयाने मला सन्मानाने निर्दोष मुक्त केले आहे. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे."