नाशिक,
cameras protective for Simhastha सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेने मोठी तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत पुढील दोन महिन्यांत शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १,५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. भाविकांची सुरक्षितता आणि शहरातील हालचालींवर रिअल-टाइम लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक निगराणी यंत्रणा उभारण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत दिली.
महापालिकेने एकात्मिक निगराणी प्रणालीअंतर्गत शहरात एकूण ३,३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. या यंत्रणेमुळे कुंभमेळ्यापूर्वी गर्दी व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीची (एसओपी) चाचणी घेता येणार असून, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी आधीच ओळखून त्यावर उपाययोजना करणे शक्य होणार आहे. शहरातील गर्दीची हालचाल, वाहतुकीची स्थिती आणि सुरक्षेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी ठरणार असून, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला तातडीने निर्णय घेणे आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत शाही मार्ग, साधुग्राम, रामकुंड, गोदाघाटाकडे जाणारे प्रमुख रस्ते, शहरातील प्रवेशद्वारे, पार्किंग क्षेत्रे आणि महत्त्वाचे चौक येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. यासाठी स्वतंत्र ऑप्टिकल फायबर नेटवर्क उभारण्यात येत असून, आतापर्यंत २६५ किलोमीटर फायबर नेटवर्कचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसोबत टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात सुरू असलेल्या रस्ते, पूल, पाणीपुरवठा, सांडपाणी व जलनिस्सारण व्यवस्था, मलनिस्सारण प्रकल्प, अग्निसुरक्षा आणि आरोग्य सुविधांच्या कामांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. गंगापूर फाटा, आंबड, राजीव गांधी मार्ग, त्र्यंबक रोड आणि सातपूर या प्रमुख मार्गांवरील विकासकामे नियोजनानुसार सुरू असून, त्यापैकी बहुतांश कामे ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७पूर्वी सर्व विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, महापालिका त्यावर नियमितपणे देखरेख ठेवत असल्याचे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले.