कॉक्रोच जनता पार्टी!

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
दिल्ली दिनांक
 
रवींद्र दाणी
cjp कॉक्रोच जनता पार्टी प्रथम स्थापन झाली आणि नंतर या पक्षाने एक आंदोलन करीत ते यशस्वीरीत्या तडीस नेले. आता या पक्षाच्या भवितव्याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू असून वेेगवगळे कयासही व्यक्त केले जात आहेत. साधारणत: राजकीय पक्षाचा जन्म दोन प्रकारे होत असतो. विचारांच्या मंथनातून आणि एखाद्या आंदोलनातून. एखादा विचार घेऊन स्थापन होणारे पक्ष टिकतात आणि आंदोलनातून स्थापन होणारे पक्ष काळाच्या ओघात अस्तंगत होतात असा एक इतिहास आहे. काँग्रेस पक्ष स्वातंत्र्याच्या विचारातून स्थापन झाला. हा पक्ष आजही अस्तित्वात आहे. प्रथम जनसंघ व नंतर भाजप याची स्थापना एका विचारातून झाली. तो पक्ष आज केंद्रात सत्तारूढ आहे. याउलट आणिबाणीच्या विरोधात स्थापन झालेली जनता पार्टी केव्हाच खंडित आणि विसर्जित झाली.
 
cjp
 
 
आंदोलनातून राजकीय पक्ष जन्मास येण्याचे मागील उदाहरण म्हणजे अण्णा हजारे आंदोलनातून जन्मास आलेली आम आदमी पार्टी! अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने दिल्लीवासीयांची मने जिंकली आणि नंतर मतेही जिंकली. प्रथम दिल्लीत व नंतर पंजाब या दोन राज्यांत या पक्षाला सत्ता मिळाली. मात्र, इतर राज्यांमध्ये या पक्षाला आपले पाय रोवता आले नाहीत आणि आता तर दिल्लीची सत्ता गमावल्यानंतर पंजाबची सत्ताही पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाला गमवावी लागेल अशी चिन्हे आहेत.
आम आदमी पक्षालाही युवकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. दिल्लीचा युवा वर्ग या पक्षाचा जणू भक्त झाला होता. पण, ती स्थिती फार काळ टिकली नाही. अन्य राज्यांत या पक्षाला आपले हात-पाय पसरता आले नाहीत. आता तर आम आदमी पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
एक योगायोग : जनता पार्टी, आम आदमी पार्टी व कॉक्रोच जनता पार्टी या तिन्ही पक्षांच्या स्थापनेपूर्वी झालेल्या आंदोलनात युवक आघाडीवर होते. पण ना जनता पार्टीला आपले अस्तित्व टिकविता आले ना आम आदमी पक्षाला दिल्ली- पंजाबबाहेर आपला जम बसविता आला. या साऱ्या पृष्ठभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे भवितव्य काय असेल यावर चर्चा सुरू झाली आहे. यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या पक्षाच्या नेत्यांनी अद्याप तरी राजकारणात येण्याचे संकेत दिलेले नाहीत. पण, राजकारणाचा मोह एवढा अनावर असतो की येणाऱ्या काळात हा पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरलेला दिसेल आणि तेव्हा या पक्षाची खरी कसोटी लागलेली दिसेल.

आंदोलन आणि पक्ष : एखादे जनआंदोलन चालविणे आणि पक्ष चालविणे यात फार मोठे अंतर असते. ‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटला. पेपरफूट ही देशातील काही नवी घटना नाही. पण, यावेळी २० ‘नीट’ इच्छुकांनी आत्महत्या केली. ही एक आगळी घटना होती. त्याची दखल घेतली जाणे आवश्यक होते. ती घेतली न गेल्याने विद्यार्थी वर्गात एक अस्वस्थता होती आणि त्यात सरन्यायाधीशांच्या एका विधानाने ठिणगीचे काम केले. सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत यांनी आपल्या या विधानाचा विपर्यास झाल्याचे म्हटले असले तरी त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. या पक्षाने देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. ती वाढत गेली आणि अखेर सरकारला प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.
कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेल्या या यशाने स्वाभाविकच या पक्षाचे नेते हूरळून गेले आहेत आणि नवनव्या घोषणा ऐकू येऊ लागल्या आहेत. पुढील क्रमांक यांचा वा त्यांचा अशी चर्चाही सुरू झाली आहे. या नव्या पक्षाला खरोखरीच असे यश मिळत जाईल काय? या प्रश्नाचे उत्तर देणे तसे अवघड आहे. कारण, ‘नीट’ची परीक्षा हा विद्यार्थ्यांसाठी जिव्हाळ्याचा आणि भवितव्याचा प्रश्न होता. या मुख्य कारणासाठी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा मिळाला. आता अन्य विषयांवरही या पक्षाने आंदोलन सुरू केल्यास त्यास तेवढाच पाठिंबा मिळेल असे मानणे चुकीचे ठरेल. मग या पक्षाला राजकीय पक्षाचे स्वरूप आलेले असेल आणि राजकीय स्वरूप-रूप आल्यानंतर या नव्या पक्षाला आपले अस्तित्व टिकविणे तेवढे सोपे जाणार नाही. आज देशातील विरोधी पक्ष कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देत आहेत. पण एकदा या पक्षाने आपली राजकीय महत्त्वाकांक्षा उघड केली की मग आज या पक्षाला पाठिंबा देणारे राजकीय पक्ष आपल्या भूमिका बदलण्यास वेळ लावणार नाहीत.
सर्वांत मोठा प्रश्न : कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांसमोरील सर्वांत मोठा प्रश्न हा राहणार आहे- देशाच्या राजकारणात एक दबावगट म्हणून काम करावयाचे, विद्यार्थ्यांच्या मुद्यांपुरते स्वत:ला मर्यादित ठेवायचे की राजकीय पक्ष स्थापन करून राजकारणात उडी मारावयाची. कॉक्रोच नेत्यांसमोर हे तीन पर्याय राहणार असून त्यातून एकाची निवड करणे पक्षासाठी सोपे काम राहणार नाही. कारण जनभावनांवर आधारलेला राजकीय पक्ष फार काळ टिकत नाही असा आजवरचा अनुभव आहे. राजकीय पक्ष स्थापन करून, तो चालविणे ही काही सोपी बाब नाही. कारण, राजकारण आले की पैसा आला आणि मग पैसा आणण्यासाठी वेगवेगळे मार्ग आले. कॉक्रोच जनता पार्टीने हे सुरू केले की त्या पक्षातही समस्या येणार आणि सत्तासंघर्ष सुरू होणार. आणि मग अन्य राजकीय पक्ष व कॉक्रोच जनता पार्टी यात काहीही फरक राहणार नाही. आम आदमी पार्टी हे त्याचे उदाहरण आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीने काही चांगली कामे केलीत. पण भ्रष्टाचाराच्या दलदलीत हा पक्षही फसला.
युवा नेतृत्व : कॉक्रोच जनता पार्टीच्या काही युवा नेत्यांची नावे चर्चेत आहेत. राजकारण, त्यातील डावपेच हे सारे त्यांच्यासाठी नवे राहणार आहे आणि यात दिल्लीचे राजकारण? ते तर भल्याभल्यांना पेलवले नाही. जम्मू- काश्मीरचे एक नेते, माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनी ‘आतिष-ए-चिनार’ या शीर्षकाने आपले आत्मचरित्र लिहिले. त्यात त्यांचे एक मार्मिक विधान आहे. ते लिहितात - ‘‘मी माझ्या मुलाला- डॉ. फारुख अब्दुल्ला यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची तर दिली. पण, माझा अनुभव त्याला देऊ शकलो नाही. कारण, अनुभव ही अशी एक बाब आहे की ती देता येत नाही, ती मिळवावी लागते.’’
लांब रस्ता... : कॉक्रोच जनता पार्टीला एक यश मिळाले आहे.cjp पण, हे यश एक पक्ष म्हणून नाही तर एक आंदोलन म्हणून मिळाले आहे. यात त्यांना अन्य विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. आता या संघटनेचे युवा नेते कोणता निर्णय घेतात यावर त्यांच्या आंदोलनाचे, संघटनेचे आणि स्वत: त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
देशभरातील विद्यार्थ्यांनी त्यांना भरघोस पाठिंबा दिला असला तरी देश चालविण्याएवढा अनुभव त्यांच्याजवळ नाही. आणि अनुभव ही अशी एक बाब आहे ही जी एका आंदोलनातून वा एका निवडणुकीतून मिळत नाही. १९८४ च्या निवडणुकीत राजीव गांधींना ४१३ खासदारांचे अभूतपूर्व यश मिळाले. पण, सरकार चालविण्याचा अनुभव त्यांच्याजवळ नव्हता. परिणामी १९८९ च्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता गेली.
एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मिळविण्यात यश आल्यानंतर, कॉक्रोच पार्टीच्या नेत्यांनी दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केलेली ‘पार्टी’ हा या पक्षासाठी शुभशकुन मानला जात नाही. पराजय पचविण्यासाठी जशी एक ताकद लागते, त्याहून अधिक ताकद व परिपक्वता विजय पचविण्यासाठी लागते. अर्थात हे सारे अनुभवातून कॉक्रोच पक्षाच्या लक्षात येईल आणि अनुभव मिळविण्याचा कोणताही ‘शाॅर्ट कट‘ नसतो.