टीसीएस नाशिक प्रकरणातील पाच आरोपींना सशर्त जामीन!

न्यायालयाने घातल्या कडक अटी

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
नाशिक,
Conditional bail in TCS case नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना नाशिक न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील तपास जवळपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींना जामीन देण्यास हरकत नसल्याचे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित विनायक खरकर यांनी नोंदवत हा आदेश दिला.या प्रकरणात रझा रफीक मेमन, आसिफ आफताब अन्सारी, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी, शफी भिकन शेख आणि तौसिफ बिलाल अत्तार यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी झाली. मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर साक्षीदारांवर दबाव आणतील किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड करतील, अशी ठोस शक्यता नसल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले.
 
 
Conditional bail in TCS case
 
जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपींवर काही कठोर अटीही लागू केल्या आहेत. खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे त्यांच्यासाठी बंधनकारक राहणार आहे. याशिवाय तक्रारदार महिलेच्या कार्यस्थळाच्या किंवा राहत्या परिसराच्या जवळ जाण्यास, तिच्याशी अथवा या प्रकरणातील साक्षीदारांशी संपर्क साधण्यास तसेच प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी संवाद ठेवण्यास आरोपींना मनाई करण्यात आली आहे.टीसीएसच्या नाशिक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक छळ, सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळाशी संबंधित एकूण नऊ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत टीसीएस कंपनीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीत कोणत्याही प्रकारच्या छळवणुकीला किंवा सक्तीला अजिबात सहन केले जाणार नाही, असे सांगत 'झिरो टॉलरन्स' धोरण लागू असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच लैंगिक छळाच्या आरोपांमध्ये ज्यांची नावे समोर आली आहेत, त्या कर्मचाऱ्यांना कंपनीने निलंबित केल्याचेही स्पष्ट केले आहे.