मासेमारी जीवावर बेतली; एकाचा मृत्यू

*दुसरा अद्याप बेपत्ता *गराडी नाल्यावरील घटना

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
ब्रम्हपुरी,
death-by-drowning : मासेमारीसाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, तर त्याचा दुसरा मित्र अजूनही बेपत्ता आहे. अरुण श्रावण डोंगरवार (39) असे मृत व्यक्तीचे नाव असून, जयपाल प्रल्हाद नाकतोडे (35, दोघेही रा. उदापूर) यांचा शोध सुरू आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे शोधमोहिमेत मोठा अडथळा निर्माण झाला असून, पोलिस प्रशासनाकडूनही यावर हताशा व्यक्त केली जात आहे.
 
 
hmjh
 
 
उदापूर येथील रहिवासी अरुण डोंगरवार व जयपाल नाकतोडे हे दोघे मित्र 30 जुलै रोजी दुचाकीने गावाजवळील गराडी नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, रात्र झाली तरी दोघेही घरी न परतल्याने नातेवाइकांनी व ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा काहीही सुगावा लागला नाही. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास पारडगाव येथील शेताजवळील नाल्याच्या पाण्यात अरुण डोंगरवार यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मासेमारी करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात ओढले गेले असावेत आणि बुडून अरुण यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, बेपत्ता जयपाल नाकतोडे यांचा शोध घेण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नाल्यातील पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि खोलीमुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत आहेत. ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद बानबले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाल्यात व्यापक शोधमोहीम राबवण्यासाठी बोटीची नितांत गरज आहे.
 
 
यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख तथा तहसीलदार सतीश मासळ, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील आणि ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांच्याकडे पत्राद्वारे बोटीची तातडीने मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित अधिकार्‍यांकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. विशेष म्हणजे, आपत्ती व्यवस्थापन समितीकडे बोट उपलब्ध आहे. परंतु ती चालवण्यासाठी प्रशासनाकडे प्रशिक्षित मनुष्यबळच उपलब्ध नाही. त्यामुळे शोधमोहीम पूर्णपणे थंडबस्त्यात पडली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात नदी-नाल्यांना येणारा पूर आणि पाण्यात बुडून होणार्‍या दुर्घटनांचे प्रमाण मोठे आहे. असे असतानाही प्रशिक्षित बोटचालक नसणे, ही प्रशासनाची उघडी पडलेली मोठी उणीव आहे. सरकारी यंत्रणेच्या या दिरंगाईमुळे आणि आपसातील असहकार्यामुळे बेपत्ता जयपाल यांचा शोध घेण्यात प्रचंड विलंब होत आहे. ऐन संकटसमयी प्रशासनाचा हा गलथानपणा समोर आल्याने उदापूर व परिसरातील ग्रामस्थांसह नातेवाइकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.