विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करा

संजय सलेवाड यांची मागणी

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
ढाणकी,
bus-service : मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थिनींसाठी ढाणकी येथून सुरू असलेल्या बससेवेचे विभाजन करून अतिरिक्त स्वतंत्र बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख संजय सलेवाड यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाèयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
jlk
 
निवेदनात नमूद केल्यानुसार, ढाणकी येथील कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयामध्ये परिसरातील अनेक गावांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. त्यांच्या प्रवासासाठी मानव विकास मिशन अंतर्गत सध्या उमरखेडवरून सुटणारी एकच बस उपलब्ध आहे. ही बस उमरखेडहून निघून ढाणकी, टेंभूरदरा, दत्तनगर, वाडी, खरूस ते ढाणकी व त्यानंतर जेवली, पिंपळगाव ते ढाणकी अशा लांबच्या व दुहेरी मार्गाने धावते.
 
 
या एकाच बसमुळे विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा मोठा वेळ प्रवासात वाया जातो. यामुळे अनेकदा विद्यार्थिनींचे सुरुवातीच्या तासिका बुडतात. या मानसिक व शारीरिक त्रासाचा त्यांच्या आरोग्यावर व अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे.
 
 
कृष्णापूर व धानोरा (सा.) या भागातील जवळपास 125 ते 130 विद्यार्थिनींना केवळ एकाच बसमध्ये प्रवास करावा लागत आहे. बसमधील प्रचंड गर्दीमुळे विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विद्यार्थिनींची ही गैरसोय टाळण्यासाठी व त्यांचा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी सध्याच्या बससेवेचे विभाजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
 
या मागणी नुसार ढाणकी-जेवली-पिंपळगाव-ढाणकी, ढाणकी-टेंभूरदरा-वाडी-खरूस-ढाणकी व कृष्णपूर-धानोरा (सा.)-ढाणकी अशा तीन बसेस सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती संजय सलेवाड यांनी निवेदनातून केली आहे.