मुंबई,
deposited into farmers' accounts राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. या पहिल्या टप्प्यात तब्बल १६ लाख ९४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ७ हजार कोटी रुपये वर्ग करण्यात येणार आहेत.सहकार विभागाने या कर्जमाफी प्रक्रियेला गती दिली असून, थकीत पीक कर्जाचा भार असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने पीक कर्ज मिळवण्याचा मार्गही खुला होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दोन लाख रुपयांच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आली होती.या तपासणीत ९४ हजार शेतकरी प्राप्तिकर भरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यानंतर उर्वरित १६ लाख ९४ हजार शेतकऱ्यांची पात्र यादी निश्चित करण्यात आली असून, आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जात आहे.
याशिवाय नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी जाहीर केला आहे. तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने विशेष तरतूद केली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील उर्वरित कर्जाची रक्कम बँकेत भरल्यानंतर ‘एकवेळ समझोता’ म्हणजेच वन टाईम सेटलमेंट योजनेअंतर्गत सरकारकडून त्यांच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले जाणार आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन केले आहे. कर्जमाफीच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.