वाशीम,
dr-vijay-jadhav : राजस्थान महाविद्यालय, वाशीम येथील मराठी विभागाचे कथाकार, महाराष्ट्र शासन पारितोषिक प्राप्त डॉ. विजय जाधव यांची ‘ अस्वस्थ तांडा’ या कथासंग्रहातील अतिशय प्रसिद्ध असलेली ‘ दणका’ नावाची कथा, सत्र सहावे, मराठी मेजर विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली आहे.
डॉ. विजय जाधव यांचे आतापर्यंत दहा पुस्तके प्रकाशित झालेली असून, त्यांपैकी पाच पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विषयासाठी यापूर्वी त्यांची ‘कस्तुरी’ नावाची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट होती. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकास इतर दहा पुरस्कार प्राप्त झाले असून, वेदनाग्रस्त लोकांच्या दुःखांना मुखर करण्याचे काम त्यांच्या साहित्यातून होत असते. विशेषतः बंजारा समाजातील व्यथा-वेदनेवर ते लिहीत असतात.
‘दणका’ या कथेमध्येसुद्धा बंजारा तांड्यातील विद्यमान स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात केलेल्या संघर्षाचे हृदय पिळवटून टाकणारे वर्णन आलेले आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या विज्ञान भाषा अभ्यास मंडळाचे ते मागील पंधरा वर्षांपासून सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे तीन ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर असून, त्यांच्या लेखनातील सातत्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.