Eclipse on Raksha Bandhan ऑगस्ट २०२६ हा महिना खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून विशेष ठरणार आहे. या महिन्यात अवघ्या पंधरा दिवसांच्या अंतराने वर्षातील दुसरे खग्रास सूर्यग्रहण आणि खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील हरियाली अमावस्येला सूर्यग्रहण, तर २८ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. मात्र, ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नसल्याने सुतक काळ लागू होणार नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
१२ ऑगस्ट रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण आर्क्टिक, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, रशिया आणि पोर्तुगालच्या काही भागांत दिसणार आहे. तसेच उत्तर अमेरिका, युरोप आणि पश्चिम आफ्रिकेतील काही भागांत ते अंशतः दिसेल. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे त्याचा धार्मिक परिणाम येथे मानला जाणार नाही. याचप्रमाणे २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी होणारे खग्रास चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप तसेच आफ्रिकेतील काही भागांत दिसेल. भारतात हे चंद्रग्रहणही दिसणार नसल्यामुळे सुतक काळ पाळण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले जात आहे.
एकाच पंधरवड्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणे ही दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटना मानली जाते. त्यांनी वराहमिहिर लिखित 'बृहत्संहिता'मधील 'राहुचर अध्याय'चा संदर्भ देत सांगितले की, अशा ग्रहणांनंतर जागतिक स्तरावर हवामानातील बदल, देशांमधील तणाव, प्रशासकीय आव्हाने किंवा नैसर्गिक आपत्तींच्या शक्यतांचा उल्लेख पारंपरिक ज्योतिषशास्त्रात आढळतो. मात्र, हे पारंपरिक ज्योतिषीय मत असून त्याला वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध भविष्यवाणी मानले जात नाही. तज्ज्ञांच्या मते, ग्रहणकाळात नियमित पूजा, प्रार्थना आणि धार्मिक विधी सुरू ठेवण्यास कोणतीही अडचण नाही. भगवान शिव, देवी दुर्गा आणि हनुमान यांची उपासना तसेच महामृत्युंजय मंत्र, दुर्गा सप्तशती आणि हनुमान चालीसाचे पठण करणे शुभ मानले जाते.