सेलू,
solar-energy-investment : महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिले येत असल्याचा गंभीर आरोप करत सेलू बोरी (बोरधरण) येथील हॉटेल व्यावसायिक विनोद गोमासे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप गोमासे यांनी केला असून, या प्रकरणामुळे स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

विनोद गोमासे यांनी आपल्या हॉटेल ठिकाणी १० किलोवॅट क्षमतेचा व्यावसायिक सोलर लावलेला आहे. यापूर्वी साध्या मीटरवर त्यांचे वीजबिल किमान शुल्काच्या स्वरूपात येत होते. मात्र, जुने मीटर जळाल्यानंतर महावितरणने त्यांच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले. त्यानंतर प्रत्यक्ष वीजवापर कमी असतानाही अवाजवी वीजबिले येण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर गोमासे यांना मार्च महिन्यात ५ हजार ८०० रुपये, एप्रिल व मे या दोन महिन्यांचे मिळून २८ हजार २१० रुपये, जून महिन्यात २९ हजार ४० रुपये आणि जुलै महिन्यात १५ हजार ५३० रुपये इतके प्रचंड वीजबिल भरावे लागले. या वाढीव बिलांमुळे आपल्या व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून, हा अन्यायकारक भूर्दंड असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात गोमासे यांनी हिंगणी, सेलू येथील महावितरण कार्यालय तसेच वर्धा येथील संबंधित वरिष्ठ अधिकार्यांकडे अनेकवेळा लेखी व तोंडी तक्रारी करून स्मार्ट मीटर हटवून साधे मीटर बसविण्याची मागणी केली होती. मात्र, आठ महिन्यांहून अधिक काळ लोटूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही गोमासे यांनी सांगितले. दरम्यान, संतप्त गोमासे यांनी २७ जुलै रोजी निवेदन देत १५ ऑगस्टपर्यंत स्मार्ट मीटर काढून साधे मीटर बसविण्यात आले नाही, तर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, ऊर्जा राज्यमंत्री, जिल्हाधिकारी तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर महावितरण प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांच्या तक्रारी राज्यभरातून समोर येत असताना, बोरी येथील ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून व्यावसायिकाला न्याय द्यावा तसेच स्मार्ट मीटरच्या कार्यक्षमतेची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.