पाकिस्तानातील शांतता रॅलीवर स्फोट, १४ ठार

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Explosion at peace rally in Pakistan पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता रॅलीदरम्यान रविवारी भीषण स्फोट झाला. या घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, स्वात जिल्ह्यातील काबल शहरात 'स्वात अमन जिरगा' या स्थानिक आदिवासी परिषदेने शांततेच्या समर्थनार्थ या रॅलीचे आयोजन केले होते. कार्यक्रम सुरू असतानाच जोरदार स्फोट झाला. स्वात पोलिसांनी मृतांचा आकडा १४ असल्याची पुष्टी केली असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत.
 
 
 

Explosion at peace rally in Pakistan 
प्राथमिक माहितीनुसार हा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तसेच या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.घटनेनंतर बचाव पथके आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून संपूर्ण परिसर सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतला आहे. स्फोटाचे नेमके कारण आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
 
 
यापूर्वी २६ जुलै रोजीही खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजोर जिल्ह्यातील सालारझाई तहसीलमधील ताली धरणाजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेत मृतांची ओळख गुलाम आणि सुलेमान कारी अशी झाली होती. गेल्या काही वर्षांपासून खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवादी कारवाया, अफगाणिस्तान सीमेवरील घुसखोरी आणि सुरक्षा दलांशी होणारे संघर्ष यामुळे अस्थिरतेचे वातावरण आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील ड्युरँड रेषेच्या मुद्द्यावरही या भागात दीर्घकाळापासून तणाव कायम आहे.