तभा वृत्तसेवा
आर्णी,
solar-company : तालुक्यातील शिरपूर येथे ‘युनिफर ग्रीन फिल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने 2022 मध्ये उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकèयांकडून तब्बल 500 एकर जमीन संपादित केली आहे. यातील 200 एकर जमीन 29 वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. मात्र, शासकीय नियमानुसार मिळणारा हेक्टरी किमान 1 लाख 25 हजार रुपयांचा दर न देता, कंपनीने निरक्षरतेचा गैरफायदा घेत केवळ 25 ते 30 हजार रुपये एकरी दराने करारनामा केला. यामुळे बाधित शेतकèयांचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.
‘प्रहार’चे तालुकाप्रमुख रवी जाधव यांनी या अन्यायाविरोधात एल्गार पुकारला आहे. 2022 पासूनची थकबाकी तातडीने देण्यात यावी आणि चालू वर्षापासून एकरी 50 ते 51 हजार रुपये भाडे लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कंपनीविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी उपतालुकाप्रमुख मिरज राठोड, विश्वनाथ राठोड, प्रकाश नाईक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.