जळगावात हॉटेल्सवर एफडीएचा छापा... नेमक काय सापडल?

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
जळगाव,
FDA raids hotels in Jalgaon नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई मोहीम राबवली आहे. अस्वच्छ हॉटेल्स, विनापरवाना अन्न व्यवसाय, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ तसेच प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर विभागाने कठोर कारवाई केली आहे. या मोहिमेत पाच हॉटेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, गुटख्याच्या २२ प्रकरणांत २८ संशयितांना अटक करण्यात आली आहे.एफडीएकडून राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध विक्रीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या २२ कारवायांमध्ये तब्बल ३८ लाख १३ हजार ४९३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणांमध्ये २८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुटख्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.
 
 
 
fda
 
यासोबतच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या विविध अन्नपदार्थांचीही तपासणी करण्यात आली. प्रिझर्व्ह फूड, तूप, बेकरी उत्पादने, सुटे खाद्यतेल, मिठाई आणि दूध या पदार्थांशी संबंधित १६ प्रकरणांमध्ये १६ लाख ३ हजार ९१६ रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जात असून, अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार आहे.तपासणीमध्ये निकृष्ट आणि दूषित आढळलेल्या ५०४ लिटर दुधाचा साठा नष्ट करण्यात आला आहे. या दुधाची अंदाजे किंमत २६ हजार ४८७ रुपये असल्याची माहिती एफडीएने दिली. दूषित दूध ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याने संभाव्य आरोग्य धोका टळल्याचे प्रशासनाने सांगितले.
 
 
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरही एफडीएने कारवाई केली आहे. विनापरवाना अन्न व्यवसाय, उघड्यावर अन्न विक्री आणि नियमांचे पालन न करणाऱ्या ७७ प्रकरणांमध्ये ५ लाख २४ हजार रुपयांचा तडजोड दंड वसूल करण्यात आला आहे.हॉटेलमधील स्वयंपाकघराची अस्वच्छता, अन्नपदार्थांची चुकीची साठवणूक, स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा निकषांचे पालन न केल्यामुळे पाच हॉटेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आवश्यक सुधारणा केल्यानंतरच संबंधित हॉटेल्सना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देणे ही प्रत्येक अन्न व्यावसायिकाची जबाबदारी असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. पुढील काळातही जिल्ह्यात नियमित तपासणी मोहीम सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना निलंबन, परवाना रद्द करणे तसेच फौजदारी कारवाईसारख्या कठोर उपाययोजना केल्या जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.