चिमूर ,
female-student-dies : मुक्ताई धबधबा बघून दुचाकीने परतत असताना पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थीनींना भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात तीन विद्यार्थीनी गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, यातील एका विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास उमरेड-भिसी-चिमूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-ई वर भिसीजवळील 33 केव्ही वीज केंद्राच्या फाट्याजवळ घडली. रिया राजू देवगीरकर (20) असे मृत विद्यार्थीनीचे तर मैथली संतोष सावंत (19, रा. दोघेही हिंगणघाट) व ट्विंकल किशोर चिकटे (19) असे जखमी विद्यार्थीनींची नावे आहेत.

नागपूर येथील महाविद्यालयाध्ये शिक्षण घेणारे 6 मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळी दोन दुचाकींवरून चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा बघण्यासाठी निघाले होते. यामध्ये रिया देवगीरकर, मैथली सावंत, मोहीत दिनेश घटारे (19), ध्वनी गजानन कामळे (20), खुशी हरीदास इंगळे (19), आणि ट्विंकल किशोर चिकटे (19) यांचा समावेश होता. धबधबा बघून दुपारच्या सुमारास परतत असताना चिमूर मार्गावरील टाका फाट्याजवळ पाणी पिण्यासाठी सर्वांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवल्या. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या एका व्हॅगनॉर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थीनींना जोरदार धडक दिली. या धडकेत रिया देवागीरकर ही रस्त्याच्या बाजूला फेकली गेली, तर मैथली सावंत रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडली. या अपघातात रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच मैथलीच्या पायाला, कोपराला व डोक्याला जबर मार लागला. तसेच ट्विंकल चिकटे हिच्या हाताला मार लागला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून सोबत असलेल्या ध्वनी कामडे हिने तात्काळ 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना तातडीने नागपूर येथील वैद्यकीय महाविद्य।लयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रिया देवागीरकर हिला मृत घोषित केले.
या प्रकरणी भिसी पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास ठाणे प्रभारी मंगेश भोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बालकृष्ण जिभकाटे करीत आहे. पसार अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.