एटापल्ली,
teak-smugglers : एटापल्ली वनपरिक्षेत्रातील मोहुर्ली उपवन क्षेत्रात वन विभागाने सागवान तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई करत अंदाजे 50 ते 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड घेऊन जात असल्याचे वनरक्षक राकेश मडावी यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला. मात्र, जप्त केलेला ट्रक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे आणत असताना जंगलातील चिखलमय रस्त्यात अडकला. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर 2 ऑगस्ट रोजी ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले.
त्यानंतर ट्रकमधील सागवान लाकडाचा पंचनामा करण्यात आला असून, प्राथमिक अंदाजानुसार 50 ते 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वन विभागाने पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान 15 ते 16 संशयित व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध सुरू असून, संपूर्ण तस्करीचा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘पुष्पा’ स्टाईलचा डाव फसला
प्राथमिक माहितीनुसार, सागवान लाकूड धान कोंड्याच्या पोत्यांमध्ये लपवून वाहतूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वन विभागाच्या सतर्कतेमुळे पुष्पा स्टाईलचा हा डाव उधळला गेला.