पृथ्वीवर लघुग्रह धडकला तर काय?

नासा की चीन, कोण वाचवणार जगाला?

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
If an asteroid hits Earth पृथ्वीला भविष्यात लघुग्रहांच्या संभाव्य धडकेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जगभरात विविध तंत्रज्ञानावर संशोधन सुरू आहे. सध्या या क्षेत्रात अमेरिकेची अवकाश संस्था नासा आणि चीन या दोघांच्या वेगवेगळ्या संकल्पना चर्चेत आहेत. नासाने प्रत्यक्ष प्रयोगातून लघुग्रहाचा मार्ग बदलण्याची क्षमता दाखवून दिली आहे, तर चीनने मोठ्या लघुग्रहांचा धोका टाळण्यासाठी अणु स्फोटावर आधारित नवी संकल्पना मांडली आहे.शास्त्रज्ञांच्या मते, लघुग्रह हे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेच्या निर्मितीनंतर उरलेले खडकाळ अवशेष आहेत. त्यापैकी बहुतांश लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान फिरतात. मात्र काही लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेला छेदतात. २०१९ मध्ये १३० मीटर रुंदीचा एक लघुग्रह पृथ्वीपासून अवघ्या ७२ हजार किलोमीटर अंतरावरून गेला होता. त्याचा शोध अगदी शेवटच्या टप्प्यात लागल्यामुळे भविष्यात अशा धोक्यांसाठी प्रभावी संरक्षण व्यवस्था असणे किती महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष वेधले गेले.
 
If an asteroid hits Earth
 
 
२०२२ मध्ये नासाने डबल अॅस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट (DART) मोहीम यशस्वी करून प्रथमच एका अंतराळयानाची लघुग्रहाशी जाणीवपूर्वक टक्कर घडवली. या प्रयोगामुळे संबंधित लघुग्रहाचा वेग सुमारे २.७ मिलिमीटर प्रति सेकंदाने कमी झाला आणि त्याच्या कक्षेत सूक्ष्म बदल झाला. हा प्रयोग लहान आकाराच्या लघुग्रहांसाठी प्रभावी मानला जात असला, तरी काहीशे मीटर किंवा किलोमीटर आकाराच्या मोठ्या लघुग्रहांसाठी ही पद्धत अपुरी ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.याच पार्श्वभूमीवर चायनीज अॅकॅडमी ऑफ लॉन्च व्हेईकल टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी मोठ्या लघुग्रहांना रोखण्यासाठी अणु स्फोटाचा पर्याय सुचवला आहे. मे महिन्यात 'स्पेस: सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालात दोन टप्प्यांची योजना मांडण्यात आली आहे. या योजनेनुसार पहिले अंतराळयान लघुग्रहावर धातूचा भेदक (पेनेट्रेटर) डागून ३० मीटर खोल छिद्र तयार करेल. त्यानंतर दुसरे अंतराळयान त्या छिद्रात अणुबॉम्ब ठेवून स्फोट घडवेल. संगणकीय सिम्युलेशनमध्ये या पद्धतीचे विविध परिणाम समोर आले आहेत. प्रति सेकंद १० किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे येणारा ५० मीटर रुंदीचा लघुग्रह नष्ट करण्यासाठी ३०० किलोटन क्षमतेचा अणुस्फोट पुरेसा ठरू शकतो. १०० मीटर रुंदीच्या लघुग्रहासाठी ३ मेगाटन क्षमतेच्या अणुस्फोटाची गरज भासेल. तर १ किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाचा पूर्ण नाश करणे कठीण असले, तरी त्याच्या पृष्ठभागाखाली ३० मीटर खोलीवर ३ मेगाटनचा स्फोट केल्यास त्याचा वेग प्रति सेकंद ३० सेंटीमीटरने बदलता येऊ शकतो, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
संशोधकांच्या मते, पृष्ठभागाखाली ३० मीटर खोलीवर करण्यात आलेला अणुस्फोट हा नासाच्या DART मोहिमेपेक्षा सुमारे ११० पट अधिक प्रभावी ठरू शकतो. तसेच पृष्ठभागाखाली १० मीटर खोलीवर स्फोट करण्यापेक्षा ३० मीटर खोलीवरील स्फोट जवळपास तीन पट अधिक परिणामकारक असल्याचे निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे.मात्र चीनची ही योजना अद्याप सैद्धांतिक स्तरावर असून तिची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी आहेत. मोठ्या लघुग्रहांचा वेळेत शोध लागणे, दोन अंतराळयानांचे अचूक प्रक्षेपण, तसेच खोल अवकाशात अणु पेलोड पोहोचवण्यासाठी अत्यंत शक्तिशाली प्रक्षेपण यंत्रणांची आवश्यकता असेल. याशिवाय विद्यमान बाह्य अवकाश करारानुसार अवकाशात अण्वस्त्रांचा वापर करण्यास मनाई असल्याने अशी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारांमध्ये बदल करावे लागतील. दरम्यान, २०१३ मध्ये रशियातील चेल्याबिन्स्क येथे अवघ्या २० मीटर रुंदीच्या लघुग्रहाच्या स्फोटामुळे १,५०० हून अधिक लोक जखमी झाले होते आणि हजारो इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेवरून भविष्यात अधिक मोठ्या लघुग्रहाचा पृथ्वीवर परिणाम झाल्यास त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात, याची कल्पना येते. त्यामुळे लघुग्रहांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञान विकसित करण्यावर जगभरातील संशोधन संस्था भर देत आहेत.