ग्लासगो,
India to host 2030 Commonwealth Games ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा रंगतदार समारोप होताच पुढील पर्वाची अधिकृत सुरुवात झाली. समारोप सोहळ्यात स्कॉटलंडने राष्ट्रकुल खेळांचा ध्वज आणि यजमानपदाची जबाबदारी भारताकडे सोपवली. त्यामुळे आता २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या शताब्दी आवृत्तीचे आयोजन अहमदाबाद येथे होणार असून जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. या सोहळ्यामुळे भारताच्या क्रीडा इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. २०१० मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता अहमदाबाद २०३० चे यजमानपद भूषवणार आहे. यामुळे ऑस्ट्रेलियानंतर राष्ट्रकुल स्पर्धांचे दोन वेळा आयोजन करणारा भारत हा दुसरा देश ठरणार आहे.
समारोप समारंभात भारताने आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, आधुनिक विचार आणि विविधतेचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अखेरीस युनायटेड किंगडमचे राजा चार्ल्स तिसरे यांचे प्रतिनिधी प्रिन्स एडवर्ड, ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ अधिकृतपणे संपल्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रकुल खेळांचा ध्वज भारताकडे सुपूर्द करण्यात आला.समारोप सोहळ्यात सुवर्णपदक विजेती भारतीय बॉक्सर जस्मिन लँबोरिया हिने भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका पार पाडली. ध्वज हस्तांतरण सोहळ्यादरम्यान ग्लासगोच्या लॉर्ड प्रोव्होस्ट जॅकलिन मॅकलारेन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्कॉटलंडच्या उपाध्यक्षा सुसान जॅक्सन, स्कॉटिश नेटबॉलपटू एमिली निकोल, राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे, दोन वेळचे ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे ध्वज सुपूर्द करण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. यासह यजमानपद अधिकृतपणे स्कॉटलंडकडून भारताकडे हस्तांतरित झाले.
यानंतर भारतीय आणि स्कॉटिश कलाकारांनी संयुक्त सांस्कृतिक सादरीकरण करून दोन्ही देशांतील मैत्री आणि सांस्कृतिक नात्याचे दर्शन घडवले. भारताने या सादरीकरणातून अहमदाबादमध्ये होणाऱ्या २०३० राष्ट्रकुल स्पर्धांसाठी जगभरातील क्रीडाप्रेमींना आमंत्रण दिले. भारतीय तत्त्वज्ञान, लोकसंस्कृती आणि आधुनिक भारताची झलक या कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आली. दरम्यान, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. भारतीय खेळाडूंनी १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके जिंकत पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. भारताच्या या यशस्वी मोहिमेनंतर आता २०३० मध्ये अहमदाबादमध्ये होणाऱ्या शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धांकडे देशासह जगाचे लक्ष लागले आहे.