नवी दिल्ली,
India wins 13 gold medals, 39 medals ग्लासगो येथे पार पडलेल्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ३९ पदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंनी १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य पदके जिंकत पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारताकडून आणखी एका पदकाची अपेक्षा होती. मात्र, शेवटच्या दिवशी एकही पदक न मिळाल्याने भारताची पदकसंख्या ३९ वरच कायम राहिली.या स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी विशेष चमक दाखवली. बॉक्सिंगमध्ये भारताने तब्बल ७ सुवर्णांसह एकूण १० पदके जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. एकूण कामगिरीच्या जोरावर भारताने राष्ट्रकुल स्पर्धेतील आणखी एक यशस्वी मोहिम पूर्ण केली.
पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १७० पदके जिंकत अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ७० सुवर्ण, ४५ रौप्य आणि ५५ कांस्य पदके जमा झाली. इंग्लंडने २९ सुवर्ण, ४५ रौप्य आणि ३६ कांस्य अशा ११० पदकांसह दुसरे स्थान मिळवले. कॅनडाने १९ सुवर्ण, २० रौप्य आणि २३ कांस्य अशा ६२ पदकांसह तिसरे स्थान पटकावले. भारत आणि यजमान स्कॉटलंड या दोन्ही देशांनी प्रत्येकी ३९ पदके जिंकली. मात्र, अधिक रौप्य पदकांमुळे भारत चौथ्या, तर स्कॉटलंड पाचव्या स्थानावर राहिला.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताची सर्वोत्तम कामगिरी २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती. त्या वेळी भारताने ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्य अशा विक्रमी १०१ पदकांची कमाई केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे भारताने २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशा ६६ पदकांची नोंद केली होती. २०१४ मध्ये ग्लासगो येथे भारतीय खेळाडूंनी १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्य अशा एकूण ६४ पदकांची कमाई केली होती. २०२२ मध्ये बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य अशी एकूण ६१ पदके जिंकली होती. तर २०२६ मध्ये ३९ पदकांसह भारताने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवून दिली. भारतीय खेळाडूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आगामी २०३० राष्ट्रकुल स्पर्धांसाठीही देशाच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.