पुणे,
IT engineer commits suicide in Pune पुण्यातील हडपसर परिसरातील अमनोरा गोल्ड टॉवरमध्ये ३३ वर्षीय आयटी अभियंत्याच्या मृत्यूची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख राहुल वेदाभ्यास पटेल (वय ३३, मूळ रा. ओडिशा) अशी झाली असून, हडपसर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.राहुल पटेल हे अमनोरा गोल्ड टॉवरमधील फ्लॅट क्रमांक १५०३ मध्ये भाड्याने राहत होते. संबंधित सदनिका मृणाल सोनू कुमार यांच्या मालकीची आहे. राहुल हे मूळचे ओडिशातील सुगडा परिसरातील रहिवासी असून, पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत होते.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून मतभेद सुरू होते. हे वाद घटस्फोटाच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, राहुल मानसिक तणावात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, या अनुषंगाने तपास सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच या घटनेची माहिती राहुल यांच्या वडिलांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली असून, ते ओडिशाहून पुण्याकडे रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मध्यरात्री मोठा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटली. संबंधित फ्लॅटला डिजिटल लॉक असल्याने पोलिसांनी राहुल यांच्या पत्नीशी संपर्क साधून लॉकचा क्रमांक मिळवला. त्यानंतर सदनिकेत प्रवेश करून आवश्यक तपास प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.