भारतावर प्रेम...मग दुबईत वास्तव्य का? राज ठाकरे संतापले

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Madhavan and Vivek Oberawar Raj Thackeray's anger महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांच्या दुबईतील वास्तव्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवरही निशाणा साधला. मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात बोलताना, देशात सर्व काही उत्तम सुरू असल्याचे म्हणणारे लोक परदेशात का स्थायिक होत आहेत, असा सवाल त्यांनी केला.राज ठाकरे म्हणाले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची गती वाढली असून भारतात सर्व काही चांगले होत आहे, असे विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांना वाटत असेल, तर त्यांनी दुबईत राहण्याचा निर्णय का घेतला? भारतावर इतके प्रेम असल्याचे सांगणारे हे कलाकार आपल्या कुटुंबासह परदेशात का वास्तव्यास आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
 
k90
 
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटाचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, त्या चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारे विवेक ओबेरॉयदेखील दुबईत राहतात. तसेच पंतप्रधान मोदींचे कौतुक करणारे अभिनेते आर. माधवन हेही दुबईत वास्तव्यास असल्याचा उल्लेख करत त्यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली.यावेळी राज ठाकरे यांनी असा दावाही केला की, देशातील अनेक उद्योगपतींनी आपला व्यवसाय आणि वास्तव्यासाठी परदेशाचा पर्याय निवडला आहे. तसेच काही कलाकार भारतात चित्रपटांचे चित्रीकरण किंवा अन्य कामांसाठी येतात आणि त्यानंतर पुन्हा दुबईला परत जातात, असेही त्यांनी म्हटले.
 
दरम्यान, आर. माधवन यांनी यापूर्वी कोविड-१९ महामारीच्या काळात मुलाच्या जलतरण कारकिर्दीसाठी दुबईत राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. तर विवेक ओबेरॉय यांनी व्यवसायाच्या विस्तारासाठी दुबईत स्थायिक झाल्याचे सांगितले आहे. याच कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद भाषेबाबतही भाष्य केले. मात्र, त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.