तभा इफ़ेक्ट
मालेगाव,
Manka Village Bridge Repair ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे माणका गावाजवळील पूल वाहून गेला होता. याबाबत तरुण भारत मध्ये १ ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीची दखल बांधकाम विभागाने घेत तात्काळ पूल दुरुस्तीचे काम हाती घेवून पुलाची दुरुस्ती केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मुसळधार पावसामुळे मानका गावाला लागून असलेला रहदारीचा महत्त्वाच्या पुलावरील साहित्यासह संपूर्ण संरचना वाहून गेल्याने मानका गावाचा मालेगाव शहराशी असलेला थेट संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकरी वर्ग संकटात सापडला होता.

मानका येथून पांगरी फाट्याकडे जाणार्या मार्गावरील रहदारी पूर्णपणे ठप्प झाली होती. नाल्यावरील पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकार्यांनी तातडीने पावले उचलत पुलावरील दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठी सार्वजनिक बंधकाम उपविभागाचे मंगलदीप ठोकळ, शाखा अभियंता कच्छवे यांनी तात्काळ दुरुस्तीसाठी पावले उचलली. सदर पूल दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूल दुरुस्त झाल्याने या मार्गावरील रहदारी पूर्ववत होत आहे. पूल वाहून गेल्याचे वृत्त सर्वप्रथम तरुण भारने प्रकाशित केले होते. त्यानंतर अधिकार्यांनी तात्काळ दखल घेत दुरुस्तीचे कामाला सुरुवात केली. याबाबत ग्रामस्थांनी तभा प्रतिनिधी चे आभार व्यक्त केले.