अनिल कांबळे,
नागपूर,
minor-girl-becomes-a-mother : फेसबुकवरुन ओळखी झालेल्या मध्यप्रदेशातील युवकाच्या प्रेमात नागपुरातील १५ वर्षीय मुलगी पडली. बालाघाटमध्ये जाऊन ती प्रियकराची भेट घेऊन आली. त्यानंतर ती गर्भवती झाली. तिच्या आईवडिलांनी पाप लपविण्यासाठी वय जास्त असल्याचे सांगून रुग्णालयात दाखल केले. मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला. आईवडिलांनी ते बाळ भलत्याच लोकांना सोपवून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर महिला व बाल कल्याण समितीने हस्तक्षेप करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
नवव्या वर्गात शिकणारी कुमारी माता मुलगी आईवडिलांसह इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. फेसबुक वरून तिची ओळख गेल्या वर्षी बालाघाट जिल्ह्यातील विजय राऊत या तरुणासोबत झाली होती. ऑनलाईन प्रेमसंबंध बहरल्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये बालाघाटला गेली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोन महिन्यांनंतर मुलीने त्याला गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या प्रियकराने ‘तू तुझे बघून घे. मला फोन करु नको’ असे उत्तर देऊन हात वर केले.
त्यानंतर त्याने आपला फोन बंद करून या मुलीसोबतचे संबंध तोडले. दरम्यान, पुढच्या काही महिन्यात मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. त्यानंतर तिची डॉक्टरकडे नेऊन तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. बदनामीच्या भीतीपोटी कुटुंबीयांनी १० जुलैला तिला मेयोत नेले. येथे तिने गोंडस बाळाला जन्म दिला. दरम्यान, रुग्णालयात दाखल करताना कुटुंबियांनी तिचे वय वाढवून सांगितले. एवढेच नव्हे तर जन्मलेल्या मुलाला दुसऱ्या कुटुंबीयांच्या हवाली केले. हा प्रकार कळल्यानंतर महिला व बालकल्याण समितीने चौकशी सुरू केली. त्यानंतर प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी रविवारी इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बालकल्याण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी सांगितले.
बाळ एका दाम्पत्याकडे
कुमारी मातेने बाळाला जन्म देताच ते बाळ एका संतानसुखाच्या प्रतीक्षेत असलेल्या दाम्पत्याला सोपविण्यात आले. मात्र, आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे ते बाळ परत मिळविण्यात येणार आहे. पोलिस पुढचा तपास करीत आहेत.