आश्चर्यच... टोल वसुलीनंतरही महामार्गावर खड्डे!

शरद पवार रा.काँ.चा आंदोलनाचा इशारा

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
तिवसा, 
potholes-on-the-highway : अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पावसामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या तिवसा तालुका शाखेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अमरावती विभागाकडे केली आहे. यासंदर्भात सोमवारी, ३ ऑगस्टला प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
 
 
k
 
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा विदर्भातील अत्यंत वर्दळीचा असून या मार्गावर दिवस-रात्र ट्रक, बस, ट्रेलर, मालवाहू तसेच खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, मुसळधार पावसामुळे महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
विशेष म्हणजे, नागपूर ते अमरावती मार्गावरील टोलनाक्यांवरून नियमित टोल वसूल केला जात असतानाही महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. टोल भरूनही सुरक्षित रस्ता मिळत नसेल, तर टोल वसुलीचा नेमका उपयोग काय, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला.
 
 
मोझरी बायपास परिसर, मोझरी बसस्थानकाजवळ तसेच वाडेकर पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात धोकादायक खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना राव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष तवर, तिवसा तालुका अध्यक्ष हेमंत बोबडे, शहराध्यक्ष अजय सुरटकर, तालुका उपाध्यक्ष मंगेश पोल्हाड, तालुका कार्याध्यक्ष पुरुषोत्तम वाते, तालुका सचिव अनिल कडव, कामगार सेलचे तालुका अध्यक्ष आकाश लांजेवार, विलास वावरे, सतीश वानखडे, प्रशांत पांडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  
...अन्यथा तीव्र आंदोलन
 
 
संबंधित विभागाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जनहितासाठी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
(एएम ०३ एजी- महामार्ग : खराब झालेला महामार्ग)