१ हजार दिवस अखंडित पक्षी निरीक्षणाचा विक्रम

*पक्षी अभ्यासक राहुल वकारे यांची उल्लेखनीय कामगिरी

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
वर्धा, 
record-for-continuous-birdwatching : पक्षीनिरीक्षण हा केवळ छंद नसून निसर्गसंवर्धनाची अखंड साधना आहे, याची प्रचिती वर्धा जिल्ह्यातील पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार राहुल वकारे यांनी आपल्या कार्यातून दिली आहे. त्यांनी ३१ ऑटोबर २०२३ रोजी सुरू केलेल्या अखंड पक्षी निरीक्षणाच्या उपक्रमाला २६ जुलै २०२६ रोजी सलग १ हजार दिवस पूर्ण झाले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ते वर्धा जिल्ह्यातील सलग १ हजार दिवस अखंडित पक्षी निरीक्षण करणारे पहिले पक्षी अभ्यासक ठरले आहेत.
 
 

k 
 
 
 
या संपूर्ण कालावधीत त्यांनी केलेल्या प्रत्येक पक्षी निरीक्षणाची शास्त्रीय नोंद जागतिक स्तरावरील ई-बर्ड या संकेतस्थळावर नियमितपणे केली आहे. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणातून पक्ष्यांच्या वितरण, स्थलांतर, अधिवास आणि जैवविविधतेविषयी मौल्यवान माहिती जागतिक संशोधनासाठी उपलब्ध झाली आहे. या हजार दिवसांच्या प्रवासात राहुल वकारे यांनी भारतातील १४ राज्ये, एक केंद्रशासित प्रदेश आणि ८४ जिल्ह्यांमध्ये पक्षी निरीक्षण केले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, गोवा, हरियाणा, झारखंड, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांसह दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे.
 
 
पक्षीनिरीक्षणाच्या या प्रवासात त्यांनी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन (सांगली, शेवगाव-अहमदनगर व अमरावती), जागतिक बिग डे, ऑटोबर बिग डे, जागतिक बैकयार्ड पक्षी गणना, ई-बर्ड मासिक व वार्षिक आव्हाने, महाराष्ट्र शासनाचा पक्षी सप्ताह, विविध संस्थांनी आयोजित केलेल्या पक्षी शर्यती, आशियाई जलपक्षी गणना, बोर व्याघ्र प्रकल्पाचा निसर्गानुभव उपक्रम तसेच हिंगणघाट येथील सारस पक्ष्यांच्या घरट्यांची गणना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
 
 
याशिवाय त्यांनी बोर व्याघ्र प्रकल्प (वर्धा), पेंच व्याघ्र प्रकल्प (नागपूर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (चंद्रपूर), इटूरनागारम वन्यजीव अभयारण्य (तेलंगाना), बारनवापारा वन्यजीव अभयारण्य (बलौदा बाजार, छत्तीसगड) तसेच सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प (ओडिशा) येथे भेटी देऊन पक्षी निरीक्षण व पक्षी गणनेत सहभाग घेतला.
 
 
यात भारतातील विविध राज्यांमध्ये भ्रमंती करताना ४५ ई-बर्ड ‘लाइफर’ म्हणजेच स्वतःच्या निरीक्षणातील प्रथमच नोंदविलेले ४५ नवीन पक्षी प्रजातींची नोंद केली. त्यांनी वर्धा जिल्ह्याच्या पक्षीवैभवातही मोलाची भर घालत टिकेलचा पर्णवटवट्या आणि तपकिरी खाटिक या पक्ष्यांच्या जिल्ह्यातील प्रथम छायाचित्रीत नोंदी यशस्वीपणे नोंदवल्या.