बुलढाणा,
sanjay-gaikwad : शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे ही प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी असल्याचे आ. संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन आ. संजय गायकवाड यांनी केले.

शहरातील आराध्या लॉन्स येथे महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे उदघाटन आ. संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली लोकसहभागाच्या वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, महसूल उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पूजा गायकवाड, बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड, तहसीलदार विठ्ठल कुमरे, तहसीलदार, सरिता पाटील, मोताळा गटविकास अधिकारी अमित पवार, बुलढाणा गटविकास अधिकारी हिवाळे, मुख्याधिकारी गणेश पांडे, नगरसेवक बबलू मावतवाल, नगरपालिका उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, नगरसेवक विनोद बेंडवाल, नगरपालिका समाजकल्याण सभापती इंदु घट्टे, सरपंच दादाराव लवकर उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रभक्ती, शिवभक्ती आणि लोकसेवेचा संदेश देणार्या वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात होताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांचे स्वागत केले.
या महसूल समाधान शिबिरामध्ये एका छताखाली शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. महसूल, ग्रामविकास, नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी, सामाजिक न्याय, महिला व बालविकास तसेच इतर शासकीय विभागांच्या विविध योजना, दाखले, प्रमाणपत्रे, अर्ज प्रक्रिया, मार्गदर्शन आणि तातडीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
यावेळी जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, सिंचन व्यवस्थेचे नियोजन आणि पाण्याचा काटकसरीने वापर यावर भर देत त्यांनी नागरिकांना जलसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत आ. संजय गायकवाड यांनी बुलढाणा आणि मोताळा तालुयामध्ये पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला.
शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, जमिनीच्या नोंदी, फेरफार, दाखले, उत्पन्न व जातीचे प्रमाणपत्र, विविध शासकीय योजनांचे अर्ज तसेच इतर सेवांबाबत नागरिकांना तत्पर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाच्या लोकाभिमुख प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गायत्री सावजी यांनी केले. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि आयोजकांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या शिबिराला महसूल विभाग व इतर शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, लाभार्थी नागरिक, माता-भगिनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.