सहर्सा,
Saharsa Sthanakavar Passenger Train Fire बिहारमधील सहर्सा जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे एका पॅसेंजर ट्रेनला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ट्रेनमध्ये प्रवासी असतानाच ही घटना घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र, आगीच्या तडाख्यात एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. समस्तीपूर–सहर्सा मार्गावरील पॅसेंजर ट्रेन क्रमांक ६३३४४च्या इंजिनाला आणि त्याला जोडलेल्या एका डब्याला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने सर्वप्रथम प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

सहायक अग्निशमन अधिकारी निरंजन कुमार यांनी सांगितले की, रेल्वे इंजिनाला आग लागल्याची माहिती मिळताच सहर्सा अग्निशमन केंद्रातून एक फोम टेंडर आणि एक वॉटर टेंडर तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. सध्या आग पूर्णपणे नियंत्रणात असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. ट्रेनमधील एका प्रवाशाने सांगितले की, सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर पहाटे ३:४० वाजता आग लागली. त्यामुळे अनेक प्रवासी तब्बल दोन तास स्थानकावर अडकून पडले. त्यांना सहर्साकडे प्रवास करायचा होता, मात्र या घटनेमुळे त्यांचा प्रवास खोळंबला. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला असून रेल्वे प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.