साई पल्लवीचा २ कोटींच्या ऑफरला नकार

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
हैद्राबाद,
Sai Pallavi turns down a ₹2 crore offer दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी सध्या 'रामायण' चित्रपटातील सीतेच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या साध्या लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. काहींनी तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक केले, तर काहींनी मेकअप आणि पोशाखावर टीका केली. मात्र, साई पल्लवीने कायमच साधेपणाला प्राधान्य दिले असून, त्यासाठी तिने तब्बल २ कोटी रुपयांची जाहिरातही नाकारल्याचा किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.
 
 
19dff45
 
 
२०११ मध्ये साई पल्लवीला एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर देण्यात आली होती. त्यासाठी तिला २ कोटी रुपयांचे मानधनही देण्याची तयारी होती. मात्र, मोठी आर्थिक ऑफर असूनही तिने ही जाहिरात करण्यास स्पष्ट नकार दिला.साई पल्लवीने अनेकदा सांगितले आहे की, ती दैनंदिन आयुष्यात फारसा मेकअप किंवा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत नाही. नैसर्गिक रूपात राहणे तिला अधिक पसंत असून, पडद्यावरही ती मुरुम किंवा चेहऱ्यावरील नैसर्गिक वैशिष्ट्ये लपवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळेच चाहते तिला 'नॅचरल ब्युटी' म्हणून ओळखतात.
 
 
एका मुलाखतीत तिने स्पष्ट केले होते की, त्वचेच्या रंगावरून कोणाचेही सौंदर्य ठरत नाही. प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्वचेच्या रंगावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे गोरेपणाचा प्रचार करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करणे आपल्या विचारांशी विसंगत असल्याचे तिने सांगितले.२०२० मध्ये 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत साई पल्लवीने या निर्णयामागील वैयक्तिक कारणही सांगितले. तिच्या बहिणीचा रंग स्वतःपेक्षा सावळा असल्यामुळे तिला अनेकदा कमीपणाची भावना सहन करावी लागली होती. लहानपणी तिची आई भाज्या आणि फळे खाल्ल्याने रंग गोरा होईल, असे बहिणीला सांगायची. हा प्रसंग पाहून आपल्याला खूप वाईट वाटत असे आणि त्यानंतर अशा मानसिकतेविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतल्याचे साई पल्लवीने सांगितले.