कोल्हापूर,
Scam at Balumama Temple कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील प्रसिद्ध बाळूमामा देवस्थानातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. देवस्थान समितीमध्ये ६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर रागिणी खडके या फरार असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारदारांनी या कथित गैरव्यवहारामागे त्यांचाही सहभाग असल्याचा दावा केला असून, त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हाप्रमुख निलोत्पल यांनी श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीत ६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब वीराप्पा खोतकरी (रा. भडगाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांच्यासह संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संगनमत करून विश्वासघात व फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार आहे. गैरव्यवहारामागील सर्व संबंधितांची भूमिका तपासातून स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. तपास यंत्रणांकडून प्रकरणातील आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात येणार असून, तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.