वेध,
हेमंत सालोडकर,
sportspeople-and-protesting-youth : भारतीय समाजात युवक ही देशाची सर्वांत मोठी शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी होऊ शकतो, तसेच चुकीच्या दिशेने वळल्यास समाजात अस्थिरताही निर्माण होऊ शकते. आजच्या काळात एकीकडे भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत, तर दुसरीकडे काही आंदोलनकारी युवक भावनेच्या भरात हिंसक मार्ग स्वीकारून समाजात अराजकतेचे वातावरण निर्माण करताना दिसतात. या दोन्हीमधील विरोधाभास विचार करायला लावणारा आहे.

प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीत शिष्यांना वेद, शस्त्र, शास्त्र, युद्ध आणि क्रीडा यांचे सर्वांगीण शिक्षण दिले जात असे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होत असे. सर्वच जण सर्व विद्यांंमध्ये पारंगत होत होते. कालांतराने शिक्षणपद्धतीत बदल झाले आणि विविध शाखांमध्ये स्वतंत्र तज्ज्ञ तयार होऊ लागले. डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी घडले. याकडे सर्वांंचाच कल वाढत गेला. आर्थिक सुबत्ता मिळविण्यास याचा उपयोग होऊ लागला. पण यात एका क्षेत्राकडे फारसे लक्ष गेले नाही. ते म्हणजे क्रीडा क्षेत्र. या क्षेत्राकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नाही. पाहिले गेले असले तरी मुलांचाच सहभाग त्यात जास्त होता. भारतात तर क्रिकेटलाच महत्त्व होते. त्यातही मुलांंचा वरचष्मा होता. मुलींचा कल क्रीडाकडे फारसा नव्हता. त्याला पालकांंचा निराशावादी दृष्टिकोनही कारणीभूत असेल. मुलींनी केवळ परंपरागत शिक्षण घ्यावे, घर सांभाळावे हीच मानसिकता कारणीभूत आहे. दुसरा म्हणजे क्रीडा हा केवळ छंद आहे. त्यातून काय साध्य होणार अशीही विचारधारा आणि मानसिकता समाजात रुजली होती.
मात्र गेल्या काही वर्षांत परिस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, खेलो इंडियासारखे उपक्रम आणि विविध राष्ट्रीय स्पर्धांमुळे क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळाली. त्यातही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील खेल कूद, विद्यापीठस्तरीय स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यात मुलांंसोबतच मुलींचाही सहभाग लक्षणीय वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी क्रीडा सुविधांमध्ये वाढ केली, प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी दिली. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील युवक-युवती आत्मविश्वासाने क्रीडा क्षेत्रात पुढे येऊ लागले. महिला खेळाडूंच्या यशाने तर भारतीय क्रीडाक्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. महिला क्रिकेटपटू, बॉक्सिंग, कुस्ती, बॅडमिंटन, नेमबाजी, ॲथ्लेटिक्स आणि हॉकीमधील खेळाडूंनी जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले. त्यामुळे पालकांचा दृष्टिकोन बदलला असून मुलींनाही क्रीडा क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. वनवासी भागातील अनेक युवक-युवती आपल्या जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. त्यांच्या यशामुळे देशाचा गौरव वाढत आहे.
खेळाडूंंचा यशाचा झेंंडा फडकत असताना याच्या उलट, काही आंदोलनकारी युवक आपल्या मागण्यांसाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाऐवजी हिंसक किंवा आक्रमक पद्धतीचा अवलंब करत आहेत. सार्वजनिक मालमत्तेची हानी, दगडफेक किंवा समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये यामुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होते. आंदोलन हा लोकशाहीतील महत्त्वाचा अधिकार असला तरी त्यामध्ये संयम, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचे भान राखणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा आंदोलनाचा मूळ उद्देशच बाजूला पडतो आणि समाजात असंतोष वाढतो. क्रीडापटूंच्या आयुष्यात शिस्त, कठोर परिश्रम, संघभावना, संयम आणि राष्ट्राभिमान यांना अत्यंत महत्त्व असते. विजय मिळाला तरी नम्रता आणि पराभव आला तरी चिकाटी हे त्यांचे वैशिष्ट्य असते. आपल्या वर्तनातून आणि कर्तृत्वातून ते समाजाला सकारात्मक संदेश देतात. त्यामुळे त्यांचे यश हे केवळ पदकांपुरते मर्यादित राहत नाही, तर ते संपूर्ण युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. आजच्या युवकांनी आपल्या ऊर्जेचा उपयोग विध्वंसाऐवजी विकासासाठी करणे ही काळाची गरज आहे. आंदोलनाची वेळ आलीच, तर ते संवैधानिक आणि शांततामय मार्गाने व्हावे. देशाचा गौरव वाढवणाऱ्या खेळाडूंचा आदर्श समोर ठेवून शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक विचार यांचा स्वीकार केल्यास भारताची युवा शक्ती अधिक सक्षम होईल आणि राष्ट्राच्या प्रगतीला नवी गती मिळेल. एकीकडे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांंची लयलूट करणारे भारतीय तरुण खेळाडू आहेत, तर दुसरीकडे विनाकारण आंदोलन करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे युवक आहेत. पदक पटकावून देशाचा नावलौकिक करणाऱ्या खेळाडूंंचा आदर्श आंदोलक तरुणांंनी घ्यावा आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे.
९८५०७५३२८१