मुंबई,
stock-market : आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि अमेरिकेदरम्यानच्या राजनैतिक तणावात सकारात्मक चिन्हे दिसून आल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या अपेक्षांमुळे भारतीय भागबाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला, ज्यामुळे देशांतर्गत मुख्य सूचकांक मोठ्या वाढीसह बंद झाले.
दिवसभराच्या तुफान व्यवहाराअखेर मुंबई भागबाजाराचा संवेदन सूचकांक पाचशे चव्वेचाळीस अंकांच्या वाढीसह अठ्ठ्यात्तर हजार सहाशे एकोणचाळीस अंकांवर स्थिरावला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय भागबाजाराचा निर्देशांक तब्बल तीनशे एक्याण्णव अंकांच्या बंपर तेजीसह चोवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर अंकांवर बंद झाला. बाजाराची सुरुवातच मुळात मोठ्या तेजीसह झाली होती आणि दिवसभर खरेदीचा जोर कायम राहिला.
इंडिगो या देशातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीच्या भागांमध्ये आज सर्वाधिक चार टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली गेली. तसेच टीसीएस आणि इन्फोसिससारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या भागांमध्येही जोरदार वाढ झाली. याशिवाय आयटीसी, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या भागांमध्ये सकारात्मक वाढ दिसून आली.
दुसऱ्या बाजूला, सन फार्मा कंपनीच्या भागांमध्ये सर्वाधिक सुमारे दोन टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय भारती एअरटेल, मारुती सुझुकी, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचे भाग किंचित घसरणीसह बंद झाले. एकंदरीत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिलासादायक बातम्यांमुळे आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.