अग्रलेख. . .
pm narendra modi देशात सध्या एका बाजूने वैचारिक तर दुसऱ्या बाजूने संवैधानिक पातळीवर लढाई सुरू आहे. सोशल मीडियाची विविध माध्यमे, सभा, आंदोलने, लघुबैठका आणि लेखनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आणि विरोधात मते व्यक्त केली जात आहेत. खरं तर अशाप्रकारचे वातावरण हे जिवंत लोकशाहीचे लक्षण मानले पाहिजे. गेला जुलै महिना जंतरमंतरवरील आंदोलनाने गाजला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अभिजित दीपके या ३० वर्षीय युवकाने नीट पेपरफुटीच्याविरुद्ध २० जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. सुदैवाने या आंदोलनाची सांगता सकारात्मक झाली. नीट पेपरफुटीच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी सरकारने कठोर कायदा आणला. पेपरफुटीवरून सुरू झालेला संघर्ष संसदेत संपुष्टात आला. पण, या आंदोलनात युवा वर्ग कशाप्रकारे विचार करतो, हे सुद्धा उघड झाले. आंदोलन करीत असताना भावनेच्या आहारी जाऊन म्हणा की अज्ञान म्हणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन असभ्य शब्दांत टीका करण्यात आली. शिवराळ भाषा वापरली गेली.
यामध्ये मुलींचाही समावेश होता. उच्चभ्रू घरातील मुले, मुली जर अशा शिवराळ आणि गलिच्छ शब्दांचा वापर सार्वजनिकरीत्या करत असतील तर आजचा युवावर्ग कुठल्या दिशेने जात आहे, हे लक्षात येते. अर्थात, अशा युवक-युवतींची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी समस्त पालकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कहर म्हणजे पंधरा-सोळा वर्षांच्या आसपास असलेल्या मुला-मुलींनी पंतप्रधान मोदी यांच्या दिवंगत मातेविषयी गलिच्छ शब्दांचा उपयोग केला. ते दुःखद आणि खेदजनक होते. कोवळ्या वयातील या आचरणाला मानसिक दृष्टिकोनातूनही पाहायला हवे.
मानसशास्त्रात सामाजिक अस्मिता सिद्धांत नावाची संकल्पना आहे. यामध्ये व्यक्ती स्वतःला एखाद्या गटाशी जोडून घेतो. मग हे गट भाषिक, धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय आधारावरील असू शकतात. अशाप्रकारच्या व्यक्ती आपली ‘ओळख’ त्या ज्या गटाशी, समूहाशी किंवा संस्थेशी जुळलेल्या असतात, त्यानुसार तयार करीत असतात. अशा वातावरणात आम्हीच श्रेष्ठ आणि योग्य असून बाकीचे चुकीचे आणि असमर्थ, असा द्विध्रुवीय कल तयार होत असतो. पण, ही परिस्थिती कायम राहत नसते. गट आणि संस्था बदलली तर कल आणि मानसिकताही बदलत असते. आता वातावरण निवळले आहे. भावनांचा उद्रेक शांत झाला आहे. ज्यांनी अभद्र भाषा वापरली, त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगात फिरत आहेत. आपण, कुठल्या शब्दांचा वापर देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल केला, हे आता त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. पंतप्रधानांनी त्यांना माफ केले आहे. खरे तर शिव्या देणारे युवक-युवती हे पंतप्रधान मोदी यांच्या वयाच्या आसपासही नाहीत. त्यांचे आई-वडीलही पंतप्रधानांपेक्षा वयाने लहान असावेत. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीवादी देशाचे प्रमुख आणि १४० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतप्रधानांबद्दल आपण बोलतो आहोत, याचे भान युवा पिढीला नसणे, ही चिंतेची बाब आहे. मोदींना शिव्या देणाऱ्या दिल्लीतील एका पंधरा वर्षांच्या मुलीने व्हिडीओ जारी करीत माफी मागितली आहे. स्वतःविषयी घृणा उत्पन्न होत असल्याचे आणि पश्चात्ताप होत असल्याचे तिने जाहीरपणे सांगितले. या सर्व घटनाक्रमाचा परिणाम केवळ त्या मुलीवरच नव्हे तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही झाला असावा. कोवळ्या वयात चुका होत असतात. संवेदनशील मनाची माणसं जीवनभर पश्चात्ताप घेऊन जगत असतात. अशा भरकटलेल्या, मार्ग चुकलेल्या युवकांच्या मनाची अवस्था लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री व्हिडीओ संदेश जारी केला. पंतप्रधान म्हणून नव्हे तर कुटुंबातील व्यक्ती आणि वडिलकीच्या नात्याने चुकलेल्या मुला-मुलींना मार्गदर्शन करीत आपण त्यांना माफ करीत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जंतरमंतरवर आलेले सर्वच युवक-युवती आंदोलनासाठी आले, असे मुळीच नव्हते. काही फेरफटका मारण्यासाठी, सेल्फीसाठी आणि रील्स तयार करण्यासाठीही आले होते. तिथे जे वातावरण होते, त्यात ते वाहवत गेले आणि नकळत त्यांच्या तोंडून शिव्या बाहेर पडल्या असाव्यात. कधी कधी हा विषय संस्कारांचाही असतो. मुलांना घरातून, समाजातून जे संस्कार मिळत असतात, त्यानुसार त्यांचे आचार-विचार घडत असतात. कोवळ्या वयातील आपल्या मुली जर इतक्या असभ्य शब्द आणि भाषेचा उपयोग सार्वजनिकरीत्या करीत असतील तर हा आपल्या सर्वांसाठी एक सांस्कृतिक धक्का आहे. पण, या मुला-मुलींविरोधात कायदेशीर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही; या भरकटलेल्या युवांना योग्य मार्ग दाखविणे आणि मार्गदर्शन करणे आपले कर्तव्य आहे. जी आई आज या जगात नाही, तिच्याबद्दल हीन भाषा वापरल्याने मला अतीव दु:ख झाले. पण, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केल्याने प्रश्न सुटणार नाहीत. त्यांना न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणे योग्य नाही. मी तर माफ केले आहेच; पण समाजानेही त्यांना समजून घेत माफी द्यायला हवी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. मोदीजींच्या मातेविषयी अपशब्द उच्चारण्याची ही काही पहिली घटना नाही. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्याने राष्ट्रीय जनता दलाच्या मंचावरून पंतप्रधानांच्या मातेला शिवीगाळ केली होती.pm narendra modi यावरून विरोधकांच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याविषयी किती वैयक्तिक द्वेष आहे आणि मनात विष भरलेले आहे, हे दिसून येते. प्रत्येक निवडणुकीत मोदींवर वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते. तरीही उमदेपणा दाखवीत पंतप्रधान मोदी यांनी युवकांना माफ करण्याचे आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचे जे पाऊल उचलले, त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने विरोध करणारे अखिल भारतीय इमाम संघटनेचे अध्यक्ष मौलाना साजिद राशिदी यांनीही व्हिडीओ जारी करीत पंतप्रधानांचे तोंड भरून कौतुक केले. देशाचा प्रमुख म्हणून चुकलेल्या मुलांना माफ करण्याचे आणि त्यांना योग्य सल्ला देण्याचे अपेक्षित काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. जंतरमंतरवर आलेले सर्वच युवक हे चुकीचे असतील असे नाही. यातील बहुतांश आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करीत होते. आंदोलन बदनाम करण्यासाठी काही असामाजिक तत्त्वे आणि कुरापती लोक जंतरमंतरवर आलेही असतील. अशावेळी सरसकट सर्वांविरुद्ध कारवाई केली जाणार नाही, याची दक्षता सरकारने घेतली आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्या युवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार नसल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्टही केले. चुकले जरी असतील तरी ही मुलं आपलीच आहेत. त्यांना सुधारण्याची संधी देणे हे संवेदनशील सरकारचे कर्तव्य आहे.
मोदी यांनी युवकांबाबत जे पाऊल उचलले, त्यावर विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी जारी केलेल्या व्हिडीओची खिल्ली उडविली. मोदी यांनीच विद्यार्थ्यांची माफी मागावी, असे हास्यास्पद विधान केले. मोदीद्वेेषाने पछाडलेल्या राहुल गांधी यांच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. सरकारने त्यांच्याकडे लक्ष न देता असेच सकारात्मक काम सुरू ठेवले पाहिजे. पंतप्रधानांनी दिलदारी दाखवून नव्या पिढीला समजून घेतले. आता नव्या पिढीनेही देशाच्या, समाजाच्या आणि संस्कृतीच्या दृष्टीने आपल्या जबाबदाऱ्या समजून वर्तन केले पाहिजे. त्यातच त्यांचे आणि देशाचे भले आहे.