पाकिस्तानविरोधी प्रचारासाठी अमेरिकेतून निधी?

पाक मंत्र्यांचा दावा

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
इस्लामाबाद,
US Funding for anti-Pakistan propaganda पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप करत डिजिटल माध्यमांतून पाकिस्तानविरोधी प्रचार केल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओद्वारे त्यांनी हा आरोप केला असून, पाकिस्तानविरोधी दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यासाठी अमेरिकेतून आर्थिक मदत दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.अत्ताउल्लाह तरार यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी डिजिटल मार्केटिंगशी संबंधित एका व्यक्तीला अटक केली. प्राथमिक चौकशीत ही व्यक्ती सोशल मीडिया मोहिमा चालवत असल्याचे समोर आले. त्यानंतर आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता संबंधित व्यक्तीला अमेरिकेतून पैसे मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
 
 
 
inverter
 
तरार यांच्या मते, चौकशीदरम्यान संबंधित व्यक्ती एका बॉट फार्मच्या माध्यमातून पाकिस्तानविरोधी प्रचार करत असल्याची माहिती समोर आली. या नेटवर्कच्या माध्यमातून पाकिस्तान सरकार, लष्कर, लष्करप्रमुख, सरकारी संस्था आणि विविध विभागांविरोधात खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण कारवाईमागे अमेरिकेचा सहभाग असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.मात्र, पाकिस्तानच्या या आरोपांबाबत अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. तसेच या आरोपांना स्वतंत्रपणे दुजोरा मिळालेला नाही.
 
 
 
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात अमेरिकेची भूमिका, तसेच पाकिस्तानी लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या अमेरिकेतील भेटी आणि ट्रम्प यांनी केलेले त्यांचे सार्वजनिक कौतुक यामुळे दोन्ही देशांतील संबंधांबाबत चर्चा सुरू होती. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी अमेरिकेवर केलेले हे आरोप राजनैतिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.