नवी दिल्ली,
epf-wage-limit : नोकरदार वर्ग आणि पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफसाठीची (EPF Wage Limit) वेतनाची कमाल मर्यादा वाढवण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला आता वित्त मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे.
या नव्या प्रस्तावानुसार, कर्मचाऱ्यांची पीएफसाठीची सध्याची रु. १५,००० ची वेतन मर्यादा वाढवून ती २५,००० रुपये केली जाणार आहे.
काय होणार फायदा?
१. पेन्शन आणि पीएफ फंडात वाढ:
वेतन मर्यादा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणारी पीएफची रक्कम वाढेल. परिणामी, निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनची (Pension) आणि एकूण निधीची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
२. लाखो नवीन कर्मचाऱ्यांना लाभ:
सध्या १५ हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन (Basic Salary) असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळत नव्हता. परंतु, मर्यादा २५ हजार रुपये झाल्यास अससंघटित आणि खासगी क्षेत्रातील लाखो नवीन कर्मचारी EPFO च्या कक्षेत येतील आणि त्यांना सामाजिक सुरक्षा कवच लाभेल.
३. भविष्यासाठी मोठी बचत:
मागील अनेक वर्षांपासून ही मर्यादा वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पगारदारांच्या हातातील (Take Home) पगारात थोडा बदल होणार असला, तरी दीर्घकालीन भविष्याच्या दृष्टिकोनातून ही एक मोठी आर्थिक बचत ठरणार आहे. अंतिम केंद्र सरकारकडून याबाबतची अधिकृत अधिसूचना लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे.