गोतस्करांच्या तावडीत ४२ गोवंशाची सुटका

दोन कंटेनरसह ५१.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ जणांविरुद्ध गुन्हा

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
गोंदिया,
42 cattle rescued कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांना दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने अवैध वाहतूक करणार्‍या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून दोन कंटेनर, चार मोबाइल आणि जनावरे असा एकूण ५१ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही कंटेनरमधून तब्बल ४२ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी ३० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दलदलकुही ते धनेगाव मार्गावर नाकाबंदी करून करण्यात आली.
 
 
42 cattle rescued
 
सैफ भाई रा.नागपूर, मुंजबिल कुरेशी रा.कामठी, फैजुल हसन, रा.सीताबारी, जावेद अहमद, रा.उप्पलवाडी, हरिलाल ब्रिजभानसिंग रा.खडगाव, इंद्रेश कलुवा कुरेशी, अब्दुल कुरेशी रा. यशोदानगर नागपूर, फैजल अन्सारी रा.नागपूर, अन्वर शब्बीर अली, रा. कामठी, रोहित राहू देहरे, गुलाम रसूल मो. आलेनबी, रा. टेकनाका, रिताबाई मोहबे, रा. कुंभारटोली अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ ऑगस्ट रोजी पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना रविवारी पहाटेच्या सुमारास सालेकसा हद्दीतील दलदलकुही परिसरातून दोन कंटेनरमध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
 
 
माहितीच्या आधारे दलदलकुही ते धनेगाव मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. काही वेळातच दोन कंटेनर येताना दिसताच पोलिसांनी दोन्ही वाहने अडवून त्यांची तपासणी केली. एका कंटेनरमध्ये २५, तर दुसर्‍या कंटेनरमध्ये १७, अशी एकूण ४२ जनावरे आढळून आली. दरम्यान, चालकांची चौकशी केली असता दलदलकुही परिसरातून गोवंशीय जनावरे खरेदी करून कत्तलीसाठी नागपूर येथील कळमना परिसरात नेत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी ४५ लाख रुपयांचे दोन्ही कंटेनर, ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४२ गोवंशीय जनावरे व ५७ हजार रुपयांचे चार अँड्रॉइड मोबाइल असा एकूण ५१ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.