सिंदीरेल्वे,
continuous rain has ruined the roads शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरासह परिसरातील सर्व मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. मांगली आणि परसोडी मार्गांची यंदा पुन्हा अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. सकाळी ६ पासून १२ तासांत ३२ मि.मी. बरसलेल्या रिमझीम पावसामुळे चहू दिशांचे मार्ग चिखलमय झाले. लगतच्या नागपूर जिल्ह्यातील औद्यौगिक वसाहतीत नोकरी करणाऱ्यांना मांगली मार्ग जवळचा आहे.
पण, या रिपरिप पावसाने जिल्हा सीमेपर्यंत दोन्ही मार्गांवर एवढा चिखल झाला की चारचाकी वाहन चालविणे दुरापास्त झाले आहे. मांगली-दुधा शिवारांसह आसोला, परसोडी मार्गांची देखील अत्यंत दैनावस्था झाली आहे. मांगली मार्गावरील काही भागांत नगरसेवक जगदीश बोरकर व मित्रांनी फरशी अंथरुण तात्पुरती व्यवस्था करून दिली होती. शेतकऱ्यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. आ. कुणावार यांनी या नेहमीच्या समस्येची कायम सोडवणूक करावी, अशी जनतेची मागणी आहे.