‘विविधतेच्या पलीकडे एकत्व’

डॉ. मोहनजी भागवत यांचा न्यूयॉर्कमध्ये मानवतेच्या एकतेचा संदेश

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
न्यूयॉर्क,
universal oneness celebration ‘आपण एकत्वात एकत्र आहोत आणि विविधतेने सजलेले आहोत. विविधता ही नैसर्गिक आहे, तर एकता हेच सत्य आहे. शरीर आणि बाह्य रूप वेगवेगळे असले तरी आपण परस्परांशी जोडलेले आहोत,’ असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉ. मोहनजी भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये दिला. अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग (AHEAD Forum) यांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’मध्ये प्रमुख भाषण करताना त्यांनी भारताच्या वैश्विक भूमिकेसह विविधता, एकता, धर्म, पर्यावरण आणि मानवी कर्तव्यांवर भाष्य केले.
 

dr. mohanji bhagwat delivers message of universal oneness celebration in new york 
अमेरिकेचा उल्लेख करताना ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ या नावासोबत ‘प्लुरॅलिझम’ म्हणजेच बहुविधता हा शब्द वारंवार चर्चेत येतो, तर भारताचा उल्लेख करताना ‘विविधतेतील एकता’ ही संकल्पना समोर येते, असे डॉ. भागवत यांनी सांगितले. भारताच्या डीएनएमध्येच एकता आणि विविधता या दोन्ही गोष्टी आहेत. राष्ट्रे केवळ भौगोलिक अस्तित्व नसतात. या विश्वरचनेत प्रत्येक राष्ट्राला विशिष्ट कर्तव्य पार पाडायचे असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
प्रत्येक राष्ट्राला पूर्ण करण्यासाठी एक नियती असते, असे सांगत भारताच्या वैश्विक भूमिकेचे विवेचन त्यांनी केले. भारताने ‘विविधतेतील एकता’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करावी आणि वेळोवेळी संपूर्ण जगालाही तिची जाणीव करून द्यावी, ही भारताची नियती असल्याचे डॉ. मोहनजी भागवत यांनी नमूद केले. आपण एक आहोत आणि विविधतेमुळे हे एकत्व अधिक सुंदर व समृद्ध झाले आहे. त्यामुळे विविधतेचा उत्सव साजरा केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे आणि ती स्वीकारली पाहिजे. मात्र, त्याचवेळी आपल्या अंतःकरणातील एकत्वाची भावना कायम ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्राला जगाला देण्यासाठी एक संदेश, पूर्ण करण्यासाठी एक ध्येय आणि गाठण्यासाठी एक नियती असते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
 
मानवसमाजासमोर असलेल्या दोन प्रवृत्तींचे विश्लेषण करताना डॉ.मोहनजी भागवत यांनी ‘जगा आणि जगू द्या’ आणि ‘जगा, पण केवळ आमचे म्हणणे मानणाऱ्यांनाच जगू द्या’ या दोन दृष्टिकोनांचा उल्लेख केला. ‘आमचे म्हणणे ऐका, आमचे पालन करा, आम्ही तुमचे रक्षण करू,’ असे सांगणाऱ्यांच्या भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी संस्कृत आणि हिंदीतील ‘रक्षा’ या शब्दाचा संदर्भ दिला. जे केवळ आपल्या आज्ञेचे पालन करणाऱ्यांचेच रक्षण करतात, त्यांना ‘राक्षस’ म्हटले जाते, असे ते म्हणाले.
याउलट, ‘तुम्ही आमचे ऐकता की नाही, आमचे म्हणणे मानता की नाही, आमच्याबद्दल तुमचे मत काय आहे किंवा आमच्यासाठी तुम्ही किती उपयुक्त आहात, या गोष्टी दुय्यम आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्व मानव आहोत. जीवन टिकवायचे असेल तर आपल्याला बंधुभावाने एकत्र राहावे लागेल,’ अशी दुसरी प्रवृत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
मानवी जीवनातील परस्परांच्या नात्याची जाणीव करून देताना त्यांनी सांगितले की, शरीर वेगवेगळे आहेत, बाह्य स्वरूप भिन्न आहे; मात्र आपल्या अंतःकरणात आणि अस्तित्वाच्या मुळाशी काहीतरी समान आहे. ‘आपण एकमेकांचे आहोत,’ ही भावना मानवी समाजाला जोडणारी आहे. सर्वांना एकत्र ठेवणारे, सर्वांचे अस्तित्व टिकवून धरणारे, फूट पडू न देणारे, समतोल साधणारे आणि मध्यम मार्ग दाखवणारे तत्त्व म्हणजे ‘धर्म’ होय, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
पर्यावरणाच्या रक्षणाच्या कर्तव्याकडेही डॉ. मोहनजी भागवत यांनी लक्ष वेधले. आजच्या काळात फादर्स डे, मदर्स डे आदी दिवस का साजरे केले जातात, यामागे त्या व्यक्तींप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची आठवण करून देणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पर्यावरणाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचीही जाणीव ठेवली पाहिजे. आपण जे अन्न खातो, त्यामागे जगात शेती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवले तर आपण काय खाणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण कपडे परिधान करतो, कारण कापड गिरण्या आहेत, कामगार काम करीत आहेत आणि कापूस पिकवणारे शेतकरीही आहेत. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या व्यक्तीशी जोडलेली असून आपण अनेकांचे ऋणी आहोत. त्यामुळे समाजाला आणि पर्यावरणाला आपण काहीतरी परत दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
 
 
भारताच्या जागतिक भूमिकेवर पुन्हा भर देताना डॉ. मोहनजी भागवत यांनी मानवजीवनाचा उद्देशही स्पष्ट केला. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि स्वतःच्या मुक्तीसाठी तसेच जगाच्या कल्याणासाठी ते ज्ञान आचरणात आणणे, हे भारताचे ध्येय आहे. जगभरातील भारतीयांनी उपदेशातून नव्हे, तर स्वतःच्या आचरणातून हा संदेश द्यावा. प्रत्यक्ष जीवनात मूल्ये जगून दाखवणे हीच भारताची नियती आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.भारतीय वंशाच्या अमेरिकेतील आणि जगभरातील प्रवासी समुदायाबाबत बोलताना त्यांनी कर्मभूमीप्रती निष्ठा राखण्याची आणि त्याचवेळी जन्मभूमीच्या मूल्यांनुसार शाश्वत जीवन जगण्याची अपेक्षा व्यक्त केली. कर्मभूमीशी निष्ठावान राहणे, मात्र जन्मभूमीने दिलेली मूल्ये आणि संस्कार जपत शाश्वत जीवनपद्धतीचा स्वीकार करणे, हीच भारताची प्रवासी भारतीयांकडून अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
‘आपण एकत्वात एकत्र आहोत आणि universal oneness celebration  विविधतेने सजलेले आहोत. विविधता नैसर्गिक आहे आणि एकता हेच सत्य आहे. एकत्वाची सजावट म्हणून आपण विविधतेचा उत्सव साजरा करतो,’ असे डॉ. मोहनजी भागवत यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर वक्त्यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. एकमेकांना राखी बांधून एकत्वाची भावना व्यक्त करण्यात आली. या परंपरेचा संदर्भ देताना डॉ. भागवत यांनी इतरांची जबाबदारी स्वीकारणे हेच अखेरीस व्यक्तीच्या मुक्तीचे साधन ठरते, असा संदेश दिला. रक्षाबंधनातील परस्परांना बांधून घेण्याच्या भावनेतून ही जबाबदारी स्वीकारण्याची शिकवण प्रतिबिंबित होते, असे त्यांनी सांगितले.
 
 
डॉ. मोहनजी भागवत यांच्या मुख्य भाषणापूर्वी २०० धार्मिक नेत्यांच्या ‘कॉल फॉर अॅक्शन’ ठरावाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात ३० देशांतील १८० धार्मिक नेत्यांनी भविष्यासाठी जबाबदारी स्वीकारण्याच्या उद्देशाने पाच कलमी कृती आराखड्याची घोषणा केली. ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ या ‘कॉल फॉर अॅक्शन’ ठरावामध्ये कोणत्याही समुदायाला अपमान किंवा हिंसेचा धोका निर्माण झाल्यास त्याच्या प्रतिष्ठेसाठी उभे राहण्याची बांधिलकी व्यक्त करण्यात आली. तसेच द्वेष, अपमान, अमानवीकरण किंवा हिंसेचे समर्थन करण्यासाठी धर्माचा वापर करण्यास जागतिक धार्मिक नेत्यांनी स्पष्टपणे नकार दिला.या ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ला मोठा सहभाग लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी २५० संस्थांनी एकत्रितपणे योगदान दिले. अमेरिकेतील ३९ राज्ये आणि ८५० शहरांमधून तसेच २९ देशांतून सुमारे ६,००० प्रतिनिधींनी या एकत्व सोहळ्यात सहभाग घेतला. विविधतेचा स्वीकार, मानवी एकत्वाची जाणीव, परस्परांप्रती जबाबदारी आणि आचरणातून जगाला दिशा देण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
.