इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू

प्रकृती अस्वास्थ्यामुळे बंगळुरूतील शो पुढे ढकलला

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
मुंबई
emraan hashmi ‘आवारापन 2’चा अभिनेता इम्रान हाश्मी याला स्वाइन फ्लू (H1N1)ची लागण झाली आहे. सोशल मीडियावर आपल्या प्रकृतीबाबत माहिती देताना इम्रानने चाहत्यांना आपण आजारी असल्याचे सांगितले. कामानिमित्त रांची यासह अनेक ठिकाणी प्रवास केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती. अखेर शुक्रवारी, 28 ऑगस्ट रोजी त्याची H1N1 चाचणी पॉझिटिव्ह आली. प्रकृती गंभीरपणे अस्वस्थ असल्याने 29 ऑगस्ट रोजी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे बंगळुरूमधील नियोजित शोला उपस्थित राहता येणार नसल्याचे जाहीर केले.
 

emraan hashmi tests positive for swine flu, bengaluru show postponed due to ill health 
ANIच्या वृत्तानुसार, इम्रान हाश्मी शूटिंगच्या कामासाठी प्रवास करत होता आणि अलीकडेच तो रांची येथेही गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याची प्रकृती खालावू लागली. काही दिवसांपासून आरोग्याशी संबंधित त्रास जाणवत असल्याने त्याने वैद्यकीय तपासणी करून घेतली. या तपासणीत त्याला H1N1 अर्थात स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकृतीबाबतच्या बातम्या समोर येत असताना इम्रानने स्वतः इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आणि आजारपणामुळे बंगळुरूमध्ये होणाऱ्या नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले.
आपल्या चाहत्यांना संबोधित करताना इम्रानने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘हे बंगळुरू, माझी तब्येत खूप खराब आहे आणि दुर्दैवाने मी बंगळुरू शोमध्ये येऊ शकणार नाही. पण पिक्चर खत्म नहीं हुई है, बस पोस्टपोन हुई है! मी तुम्हा सर्वांना 12 सप्टेंबर, शनिवारी सनबर्न युनियनमध्ये भेटेन. तुमची तिकिटे नव्या तारखेसाठीही वैध राहतील. तुम्हा सर्वांना भेटण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे!’
दरम्यान, इम्रान हाश्मीला अलीकडेच ‘आवारापन 2’ या चित्रपटात पाहण्यात आले. या चित्रपटात दिशा पटानी मुख्य भूमिकेत असून, 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’चा हा सिक्वेल आहे. ‘आवारापन 2’मध्ये इम्रानने शिवम पंडित ही आपली भूमिका पुन्हा साकारली आहे. यानंतर त्याचे ‘गनमास्टर G9’, ‘रूह’ आणि ‘G2’ हे चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.‘आवारापन 2’च्या बॉक्स ऑफिस कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, चित्रपटाने जगभरात 205.10 कोटी रुपयांची शानदार ग्रॉस कमाई केली आहे. यामध्ये भारतातील 173.30 कोटी रुपये आणि परदेशातील बाजारपेठेतील 31.80 कोटी रुपयांचा समावेश आहे. भारतात चित्रपटाने 130,160 शोच्या माध्यमातून 145.45 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून, बॉक्स ऑफिसवर त्याची दमदार कामगिरी झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.