hockey-tournament nagpur राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विदर्भ हॉकी असोसिएशन, नागपूरच्या वतीने व आ. विकास ठाकरे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय आंतरजिल्हा हॉकी स्पर्धेला पावसातही नागपूर शहरातील शाळा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमधून आलेल्या संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धा दोन दिवसांची नियोजित होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन तसेच सहभागी सर्व संघांशी चर्चा करून अंडर-१४, अंडर-१७ व अंडर-१९ गटांतील सामने आजच पूर्ण करण्यात आले. सर्व संघांच्या सहकार्याने अंतिम सामने घेऊन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
स्पर्धेचे उद्घाटन आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी खेळाडू विवेक सीरिया, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू ईशाद मिर्झा, साहिल वैद्य, वाशीम हॉकी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ उगले, किशोर जिचकार, सचिव नंदा उगले, माजी हॉकी खेळाडू सोनिया शेळके, ऋषिकेश महल्ले तसेच हॉकी क्षेत्रातील पदाधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.