काठमांडू,
rescue operations underway in nepal चीनमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्यानंतर मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. मात्र, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट झाली आहे. त्रिशुली जलविद्युत बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू असून बोगद्याच्या आत ४ ते ५ फूट ओला चिखल आणि ढिगारा साचल्याने या मोहिमेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पाणी आणि चिखलामुळे बोगद्यात काम करणे अत्यंत कठीण असल्याचे बचाव पथकातील सदस्यांनी सांगितले.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने नेपाळसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे सी-१३० विमान शनिवारी रात्री ११ टन मदत सामग्री घेऊन नेपाळला रवाना झाले. या चौथ्या खेपेत शोध आणि बचावासाठी आवश्यक उपकरणांसह बोगद्यातील तांत्रिक पथकाचाही समावेश आहे. याशिवाय फॉरेन्सिक आणि डीएनए तज्ज्ञांचे पथकही नेपाळमध्ये पोहोचले असून मृतदेहांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत ते स्थानिक प्रशासनाला मदत करणार आहे.
भारताकडून पाठवण्यात आलेल्या सामग्रीमध्ये ब्लँकेट्स, स्लीपिंग बॅग्ज, ताडपत्री, प्लास्टिक शीट्स आणि स्वच्छता किट्स यांचा समावेश आहे. तसेच २३० फूट लांबीच्या एकेरी लेनच्या मॉड्युलर स्टील पुलाच्या उभारणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री घेऊन १६ ट्रक रस्तेमार्गे नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. बाधित भागांतील संपर्क व्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.
एस. जयशंकर यांच्या माहितीनुसार, भारताने आतापर्यंत औषधे, पोर्टेबल जनरेटर सेट, अन्न पाकिटे, वॉटर प्युरिफायर आणि तांत्रिक उपकरणांसह एकूण ६८.५ टन मदत सामग्री हवाई मार्गाने काठमांडूला पोहोचवली आहे. नेपाळ सरकारकडून मदत सामग्री किंवा तांत्रिक पथकांची मागणी होताच भारताकडून तातडीने मदत पुरवली जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या आपत्तीत आतापर्यंत ७३४ मृतदेह सापडले असून त्यापैकी केवळ २२ मृतदेहांची ओळख पटली आहे. मोठ्या संख्येने मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसल्याने प्रशासनासमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. रुग्णालयांमध्ये जागेची कमतरता असल्याने सरकारकडून मृतदेह हवाबंद पिशव्यांमध्ये दफन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारताकडून पाठवण्यात आलेले फॉरेन्सिक आणि डीएनए तज्ज्ञ या कामात महत्त्वाची मदत करू शकतात.
नेपाळमधील या विनाशकारी पुरामागे हिमनदी फुटण्याची घटना प्रमुख कारण मानली जात आहे. चीनमधील शिझांग स्वायत्त प्रदेशातील ग्यिरोंग काउंटीमध्ये एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात हिमनदी कोसळतानाचे दृश्य कैद झाले. त्यानंतर नेपाळ-चीन सीमेवरील ग्यिरोंग बंदराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात चिखलाचा ढिगारा वाहून आल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर त्रिशुली जलविद्युत बोगद्यातील अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांचे प्रयत्न सुरूच आहेत.