देवळी,
dahi handi in deoli श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून देवळी तालुका विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने यंदा पारंपरिक दहीहंडी फोड स्पर्धेऐवजी ‘चला हवा येऊ द्या’ या हास्य व मनोरंजनात्मक कार्यक्रम रविवार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक विदर्भ केसरी माजी खासदार रामदास तडस इंडोअर स्टेडियम येथे होणार असल्याची माहिती नप उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मार्गदर्शक राहुल चोपडा यांनी आज ३० रोजी पत्रकार परिषदेत दिली.

नप उपाध्यक्ष चोपडा पुढे म्हणाले की, १३ वर्षांपासून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने दहीहंडी फोड स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. मात्र, यंदा या परंपरेत बदल करून प्रतिकात्मक दहीहंडी पूजन करून चला हवा येऊ द्या या हास्य-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रथमच देवळीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध कलाकार अंकुश वाढवे, विदर्भातील अकोला जिल्ह्याचे मूळ रहिवासी तसेच अनेक मराठी चित्रपट व नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे भारत गणेशपुरे, ‘फु बाई फु’ फेम मराठी चित्रपट अभिनेत्री हेमांगी कवी व त्यांचा संच मनोरंजनाची मेजवानी सादर करणार आहे. यावेळी हास्यविनोदासोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस व मोहन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे चोपडा यांनी सांगितले.
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपूर्ण कुटुंबाला पाहता यावा, यासाठी महिला, मुले-मुली, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व नागरिकांसाठी इंडोअर स्टेडियममध्ये ५ हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी सहकुटुंब या हास्य व मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेचे उपाध्यक्ष चोपडा, विहिंप व बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष दिनेश क्षीरसागर, उपाध्यक्ष गोल्डी बग्गा, तालुका महामंत्री मोहन जोशी, बजरंग दल तालुका संयोजक वैभव झाडे यांनी केले.