‘घरात घुसून बॉम्बने उडवून देऊ’

गाझियाबादमध्ये भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांना जीवे मारण्याची धमकी

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
mla nand kishor gurjar उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून मोठी बातमी समोर आली आहे. लोनी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी हा धमकीचा फोन आल्याची माहिती स्वतः आमदार गुर्जर यांनी दिली. या प्रकरणी त्यांच्या समर्थकाने लोनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
 

ghaziabad mla nand kishor gurjar receives death threat over phone 
या घटनेबाबत नंदकिशोर गुर्जर यांनी सांगितले की, रक्षाबंधनाच्या दिवशी एका व्यक्तीचा फोन आला आणि ‘आम्ही घरात घुसून तुम्हाला बॉम्बने उडवून देऊ’ अशी धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख विचारल्यानंतरही त्याने त्याच पद्धतीने बोलणे सुरू ठेवले आणि शिवीगाळही केली. त्यावेळी आमदारांनी फोन कट केला. मात्र, त्यानंतरही अनेक वेळा त्यांना फोन आले. फोन उचलल्यानंतरही संबंधित व्यक्तीने त्याच प्रकारची भाषा वापरल्याचे गुर्जर यांनी सांगितले.
या प्रकरणाची माहिती आपण लोनी पोलिसांना दिल्याचे आमदारांनी सांगितले. ‘योगीजींचे सरकार आहे. सामान्य नागरिक असो किंवा आमदार-खासदार, प्रत्येकाच्या जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल,’ असे त्यांनी म्हटले. धमकी देणारा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, बीएनएसच्या विविध कलमांनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
नंदकिशोर गुर्जर यांनी यापूर्वीही आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. यासाठी ९ एमएम कॅलिबरच्या २५ पिस्तुलांची खरेदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.उत्तर प्रदेशातील भ्रष्टाचाराची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचा आरोप करत या सर्व प्रकारामागे मुख्य सचिव असल्याचेही गुर्जर यांनी म्हटले होते. तसेच अधिकारी भाजपचे आमदार आणि पक्षातील नेत्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचे पालन करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने या प्रकरणाकडे पोलिसांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.