मुंबई
hanuman ansh बॉक्स ऑफिसवरील कमाईचा अंदाज नेहमीच अनपेक्षित ठरतो, याचा प्रत्यय ‘हनुमान अंश’च्या कमाईने पुन्हा एकदा दिला आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक 7 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. कोणतेही प्री-रिलीज प्रमोशन किंवा मोठा गाजावाजा न करता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवशी अवघ्या 10 लाख रुपयांच्या कमाईने सुरुवात झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी सुरुवातीला फारशी प्रभावी राहिली नाही. पहिल्या दोन आठवड्यांत चित्रपटाने केवळ 1.48 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, 22व्या दिवशी ‘हनुमान अंश’च्या कमाईत अचानक मोठी वाढ पाहायला मिळाली. दरम्यान, ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनाचाही चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आणि त्यामुळे त्याच्या कलेक्शनमध्ये घसरण नोंदवण्यात आली.
मात्र तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईचे चित्र पूर्णपणे बदलले. परिस्थिती जणू काही चमत्कारिकरीत्या अनुकूल होत गेली आणि केवळ तिसऱ्या आठवड्यात ‘हनुमान अंश’ने 10.40 कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चौथ्या शुक्रवारपर्यंत चित्रपटाने 6.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतातील चित्रपटाची एकूण नेट कमाई 18.13 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असून, ‘हनुमान अंश’ने आपल्या निर्मिती खर्चापेक्षा कितीतरी अधिक कमाई करत बजेट वसूल केले आहे.‘हनुमान अंश’ची कथा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित आहे. सप्टेंबर 1973 मध्ये त्यांचे निधन झाले होते. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे त्यांच्या नावाने एक आश्रमही आहे. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती नीम करोली बाबांच्या अनुयायी असल्याचे आणि त्यांच्या शिकवणीने प्रेरित झाल्याचे सांगितले जाते. चित्रपटात शोभिनव सत्या यांनी नीम करोली बाबांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.‘हनुमान अंश’च्या 23व्या दिवसाच्या कमाईबाबतही चित्रपटाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चौथ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, तो सुमारे 8 ते 9 कोटी रुपयांची कमाई करू शकतो, असा अंदाज आहे. बातमी लिहिली जात असताना चित्रपटाने 5.07 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, संध्याकाळच्या आणि रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढल्यास हा आकडा आणखी वर जाऊ शकतो.‘हनुमान अंश’चे दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे, तर शोभिनव सत्या यांनी महाराजजींची भूमिका साकारली आहे. चित्रपटात विहान शेडगे, चंदन के. आनंद, पूर्णिमा तिवारी, अनिल रस्तोगी, गुलशन पांडे, भगवानदास पटेल, राजीव मिश्रा यांच्यासह अन्य कलाकारांच्याही भूमिका आहेत.