imran-healthy ‘आज हम दिवाली और ईद इकठ्ठा मना रहें हैं!’ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नियाझी यांच्या रुग्णालय भेटीच्या वेळी इस्लामाबादच्या रस्त्यांवर झालेली आतषबाजी पाहताना ही प्रतिक्रिया व्यक्त होत होती आणि या भेटीचा परिणाम तातडीने पाकिस्तान सरकारच्या ‘प्रकृतीवर’ होत शाहबाज शरीफ सरकारची स्थिती लकवा मारल्यागत झाली आहे.

विशेष म्हणजे संसदेत बोलताना त्यांनी एकदाही आपल्या हातांची हालचाल केली नाही. दोन्ही हात मागे करून ते बोलत राहिले. आणि बहुधा म्हणूनच भुत्तो यांनी आपल्याला डाव्या हाताने लगावली की उजव्या हेही शरीफ यांना कळले नाही.
सरकार अस्थिर : बिलावल भुत्तो आपल्याच सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशाच्या संसदेत बोलले असले तरी पंतप्रधान शाहबाज शरीफ, भुत्तो यांच्या विरोधात काहीही करू शकत नाहीत. कारण, त्यांचे सरकारच बिलावल भुत्तो यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि इम्रान खानचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ हे दोन पक्ष एकत्र आल्यास शरीफ सरकार गडगडू शकते. आणि या शक्यतेने वा चर्चेचे शाहबाज शरीफ सरकार अस्थिर झाले आहे.
मुनीर यांचे वर्चस्व : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिफ मुनीर यांचे सरकारमधील वाढते वर्चस्व पाकिस्तान पीपल्स पार्टीला मान्य नाही. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या प्रत्येक परदेश दौऱ्यात त्यांच्यासोबत मुनीर असतात. केवळ त्यांच्यासोबत नसतात तर त्यांच्या बाजूला उभे असतात. आणि विदेशी शासक पंतप्रधानापेक्षा फिल्ड मार्शल मुनीर यांना अधिक महत्त्व देत असल्याचे जगाला दिसते. यानेच पाकिस्तान पीपल्स पार्टी नाराज असल्याचे सांगितले जाते. या पक्षाला इम्रान खान यांचा मुद्दा मिळताच बिलावल भुत्तो यांनी आपल्याच सरकारवर तोफ डागली.
२७ सप्टेंबरचा लाँग मार्च : इम्रान खान मागील तीन वर्षांपासून कारागृहात असले तरी त्यांची लोकप्रियता न घटता, ती उलट वाढली आहे. आणि ही बाब शाहबाज शरीफ सरकार व फिल्ड मार्शल मुनीर यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. आता तर इम्रान खान समर्थकांनी त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी एक लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. २७ सप्टेंबर रोजी हा लाँग मार्च इस्लामाबादवर नेण्यात येणार आहे. या निर्णयाने शाहबाज सरकार हादरले आहे. यात २० लाख लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लष्कराची तैनाती : लाँग मार्चच्या निर्णयाने पाकिस्तान सरकार किती भेदरले आहे याचा पुरावा म्हणजे लाँग मार्चच्या घोषणेनंतर २४ तासांच्या आत पाकिस्तान सरकारने रावळपिंडीत लष्कराच्या काही तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असली तरी सरकार चालते ते लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीतून. येथे या तुकड्या तैनात केल्या जात आहे. केवळ सहा महिन्यांसाठी ही तैनाती असल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.
मुनीरची महत्त्वाकांक्षा : फिल्ड मार्शल मुनीर यांना पाकिस्तानचे शासक होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांच्या या मार्गातील एकमेव अडथळा म्हणजे इम्रान खान! इम्रान खान यांना सध्या १४ वर्षांची शिक्षा झालेली आहे. त्यांच्याविरोधात ५०० हून अधिक खटले दाखल करण्यात आले आहेत. इम्रान खान यांनी जनरल मुशर्रफ वा नवाज शरीफ यांच्याप्रमाणे देश सोडून अन्य देशांमध्ये आश्रय घ्यावा अशी मुनीर यांची इच्छा आहे. पण, इम्रान खान यास राजी नाहीत.
जनतेचा दबाव : इम्रान खान व पाकिस्तानी लष्कर यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी इम्रान खान यांच्या अटकेच्या विरोधात त्यांच्या समर्थकांनी लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले चढविले होते. तेव्हापासून इम्रान खान व मुनीर यांच्यातील संबंध अधिक विकोपास गेले आहेत. पाकिस्तानात लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले करण्याचे साहस आजवर कोणत्याही पक्षाने केले नव्हते. इम्रान समर्थकांनी ते प्रथमच केले.
समझोता? : येणाऱ्या काळात इम्रान खान व मुनीर यांच्यात समझोता होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण, अनेकांना ही शक्यता वाटत नाही. इम्रान खान आणि मुनीर या दोघांनाही सत्ता हवी आहे. एकाला जनतेच्या माध्यमातून आणि दुसऱ्याला लष्कराच्या माध्यमातून. पाकिस्तानच्या राजकारणातील या दोन समांतर रेषा आहेत. ज्या आजवर कधी जवळ आलेल्या नाहीत. इम्रान खान यांना सत्तेत लष्कराचा वाटा वा हस्तक्षेप मुळीच मान्य नाही आणि याचाच परिणाम म्हणजे लष्कराच्या दबावाखाली त्यांना कारागृहात डांबण्यात आले आहे.
तख्त आणि तख्ता : पाकिस्तानातील सरकार अल्ला, आर्मी व अमेरिका या तीन ‘ए’ वर अवलंबून असते असे मानले जाते. सध्याच्या स्थितीत आर्मी व अमेरिका इम्रान खानच्या विरोधात आहेत आणि अल्ला मात्र त्यांच्या बाजूने असल्याचे मानले जाते. हा एक ‘ए’ दुसऱ्या दोन ‘ए’ला म्हणजे आर्मी व अमेरिका यांना मात देईल काय याकडे जगाचे लक्ष लागले आहे. कारण, रशिया व चीन हे दोन्ही देश इम्रान खानच्या बाजूने आहेत. जागतिक रंगमंचावरील महाशक्तींच्या शह-प्रतिशहात पाकिस्तानची सत्ता कोणत्या दिशेने जात आहे हे सांगणे अवघड आहे. कारण, पाकिस्तानात ‘तख्त’आणि ‘तख्ता’- म्हणजे सिंहासन आणि फाशीचा चौथरा यातील अंतर फार कमी राहत आले आहे.