नवी दिल्ली,
ishans injury दुलीप ट्रॉफी २०२६ मधील पूर्व विभाग आणि मध्य विभाग यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. पूर्व विभागाचा कर्णधार इशान किशन दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यानंतर अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. दुलीप ट्रॉफीसाठी वैभवची पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती.
इशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सामन्याच्या पहिल्याच सत्रात १९व्या षटकात यष्टीरक्षण करताना चेंडू त्याच्या उजव्या मनगटावर आदळला. दुखापतीनंतर फिजिओथेरपिस्टकडून उपचार घेऊनही वेदना कायम असल्याने इशानला मैदान सोडावे लागले. त्यानंतर कुमार कुशाग्रने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. इशानच्या अनुपस्थितीत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने संघाचे नेतृत्व आपल्या हाती घेतले.
वैभवसाठी वरिष्ठ पुरुष क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ही पहिलीच जबाबदारी आहे. तो दुलीप ट्रॉफीमधील आपला दुसरा आणि कारकिर्दीतील एकूण १०वा प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. २०२४च्या सुरुवातीला रणजी ट्रॉफीत पदार्पण करताना त्याने सर्वात कमी वयात सामना खेळणारा क्रिकेटपटू होण्याचा विक्रम केला होता. नॉर्थ ईस्ट झोनविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. तो ८ चेंडूंत ६ धावा करून बाद झाला होता. मात्र गोलंदाजीत त्याने दोन बळी मिळवले होते.
दरम्यान, उपांत्य फेरीसाठी पूर्व विभागाच्या संघातही एक बदल करण्यात आला. मागील सामन्यात चमकदार कामगिरी करणारा शहबाज अहमद पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला अंतिम अकरातून वगळण्यात आले. त्याच्या जागी कुनैन कुरेशीला संधी देण्यात आली. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापर्यंत मध्य विभागाने ३ गडी गमावत ८१ धावा केल्या होत्या. आता इशान किशन दुखापतीतून कधी सावरतो आणि पुन्हा मैदानात परततो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.