पुणे
it-engineer-dies-by-suicide प्रियकरासोबत झालेल्या वादातून २३ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी तरुणीच्या ४९ वर्षीय काकांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत घडली.मयत तरुणी मूळची बिहारमधील पाटणा येथील असून, आरोपी हा पहाडगंज येथील रहिवासी आहे. दोघांचे शालेय शिक्षण एकत्र झाले होते. त्यानंतर तरुणीने राजस्थानमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. ती खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होती. तर आरोपी नोएडा येथील एका आयटी कंपनीत कार्यरत होता.मयत तरुणी मागील दोन महिन्यांपासून पुण्यात राहत होती. तिने नुकतीच नवीन सदनिका भाड्याने घेतली होती.
भाडेकरार करून सोमवारपासून ती या सदनिकेत राहायला जाणार होती. दरम्यान, आरोपी दोन दिवसांपूर्वी तिला भेटण्यासाठी नोएडा येथून पुण्यात आला होता. ते रिव्हर डेल या सोसायटीत राहात होते. गुरुवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमृतकुमार खोलीच्या खाली उतरला. त्याच वेळी तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.