त्रिनिदाद,
jersey number retired टी-२० क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होच्या योगदानाचा सन्मान करत ट्रिनबागो नाइट रायडर्सने मोठा निर्णय घेतला आहे. संघाने ब्राव्होचा प्रसिद्ध ४७ क्रमांकाचा जर्सी नंबर निवृत्त केला आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगच्या इतिहासात एखाद्या खेळाडूचा जर्सी क्रमांक निवृत्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ड्वेन ब्राव्होने वेस्ट इंडिजसह जगभरातील टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीची छाप पाडली. सीपीएलमध्ये खेळाडू म्हणून त्याने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. त्यानंतर ट्रिनबागो नाइट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्याने एकदा विजेतेपद पटकावले. अशा प्रकारे ब्राव्होचा फ्रँचायझीशी सहा विजेतेपदांमध्ये सहभाग राहिला आहे.
सीपीएलमधील ब्राव्होची कामगिरीही विशेष राहिली आहे. त्याने या स्पर्धेत १०७ सामने खेळताना १२९ विकेट्स घेतल्या असून तो सीपीएलमधील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत दबावाच्या परिस्थितीत प्रभावी कामगिरी करण्याची त्याची क्षमता ट्रिनबागो नाइट रायडर्सच्या यशात महत्त्वाची ठरली.
ब्राव्होची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही उल्लेखनीय आहे. त्याने ४० कसोटी, १६४ एकदिवसीय आणि ९१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकूण टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ५८२ सामने खेळून ६३१ बळी घेतले आहेत. २०१४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याचा ट्रिनबागो नाइट रायडर्सशी संबंध कायम राहिला आणि त्याने संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारीही सांभाळली.
नाइट रायडर्स ग्रुपचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी ब्राव्होच्या सन्मानाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, संघ आणि सीपीएलसाठी त्याचे योगदान केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही. ४७ क्रमांक निवृत्त करून ब्राव्होची ओळख आणि त्याच्या आठवणी फ्रँचायझीशी कायमस्वरूपी जोडून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीपीएलमध्ये असा सन्मान मिळवण्यासाठी ब्राव्हो सर्वाधिक योग्य खेळाडू असल्याचेही म्हैसूर यांनी नमूद केले.