कागिसो रबाडाच्या दुखापतीने दक्षिण आफ्रिकेची चिंता वाढली!

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
जोहान्सबर्ग,
kagiso rabadas injury दक्षिण आफ्रिकेच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून, सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून तो बाहेर पडला आहे. एवढेच नव्हे तर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याचा सहभागही अनिश्चित झाला आहे. दुखापतीची तीव्रता अधिक असल्यास विश्व कसोटी चॅम्पियनशिपमधील महत्त्वाच्या सामन्यांनाही त्याला मुकावे लागू शकते.

kagiso rabadas injury
२१ ऑगस्ट रोजी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने रबाडाच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. सरावादरम्यान त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली असून त्यामुळे त्याच्या हिवाळी तयारीला ब्रेक लागला आहे. सध्या तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली पुनर्वसनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. दरम्यान, रविवारी समोर आलेल्या एका अहवालामुळे दक्षिण आफ्रिकेची चिंता आणखी वाढली. आफ्रिकन वेबसाइट ‘रॅपॉर्ट’ने रबाडाचे लायन्स गोलंदाजी प्रशिक्षक ॲलन डोनाल्ड यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रबाडाच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला ग्रेड-३ ची दुखापत झाली असून त्याला ९ ते १० आठवडे मैदानाबाहेर राहावे लागू शकते.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी किंग्समीड येथे होईल. त्यानंतर १७ ऑक्टोबरला दुसरी, तर २५ ऑक्टोबरला न्यूलँड्स येथे तिसरी कसोटी खेळवली जाणार आहे. २१ ऑगस्टपासून मोजल्यास ९ ते १० आठवड्यांचा कालावधी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत जातो. त्यामुळे रबाडा वेळेत पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यास त्याला मालिकेतील किमान पहिल्या कसोटीला मुकावे लागू शकते. दरम्यान, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने स्पष्ट केले आहे की रबाडा २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नाही. कसोटी मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत अंतिम निर्णय त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. मालिकेची तारीख जवळ आल्यानंतरच त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
रबाडाची अनुपस्थिती दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी चिंता ठरू शकते. कसोटी क्रिकेटमध्ये तो देशाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असून, ७३ कसोटी सामन्यांत त्याने २२.०३च्या सरासरीने ३४० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा वेग, अनुभव आणि वेगवान खेळपट्ट्यांवर प्रभावी गोलंदाजी करण्याची क्षमता दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी महत्त्वाची आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या आगामी चक्रात अंतिम फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध मायदेशात कसोटी सामने खेळायचे आहेत. याशिवाय श्रीलंकेतही कसोटी सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत रबाडाची दुखापत लांबल्यास दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.