घरीच बनवा कुरकुरीत मशरूम कबाब; जाणून घ्या

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
mushroom kebabs संध्याकाळच्या चहासोबत नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळे आणि चविष्ट करून पाहता येईल. मशरूम, बेसन आणि विविध मसाल्यांचा वापर करून घरच्या घरी स्वादिष्ट मशरूम कबाब तयार करता येतात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे कबाब लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील.
 
mushroom kebabs
 
हे कबाब तयार करण्यासाठी सुरुवातीला खास मसाला तयार करावा लागेल. यासाठी २ मोठ्या वेलची, ६ लहान वेलची, ५ लवंगा, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ जायफळ, १/४ जायफळाचा तुकडा, १० काळी मिरी, १ चमचा जिरे, १ मोठा चमचा धणे, १/२ चमचा बडीशेप, १/२ चमचा स्टार ॲनिस आणि १ मोठा चमचा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्यात. हे सर्व सुके मसाले मंद आचेवर हलके भाजून घ्यावेत. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून मसाला तयार करावा.
 
यानंतर कढईत थोडे तेल गरम करून त्यात चिरलेले २ इंच आले, ३-४ पाकळ्या लसूण आणि ३० ग्रॅम काजू घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे. त्यात चिरलेले ३ कांदे घालून सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत शिजवावे. त्यानंतर ४०० ग्रॅम चिरलेले मशरूम घालून ते पूर्णपणे शिजेपर्यंत परतून घ्यावेत. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करावी.
 
तयार पेस्टमध्ये २-४ मोठे चमचे बेसन, तयार केलेला कबाब मसाला, १ चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. सर्व साहित्य नीट मिसळून मिश्रण एकजीव होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवावे. मिश्रण तयार झाल्यानंतर त्याच्या छोट्या टिक्की बनवाव्यात. तव्यावर तूप गरम करून या टिक्क्या दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात. गरमागरम मशरूम कबाब हिरव्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी खुलते.