पुणे
omya dies आपल्या वेगाने मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर तब्बल नऊ वर्षे दबदबा निर्माण करणारा आणि बैलगाडाप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘भारतकेसरी ओम्या’ या बैलाचे निधन झाले. वारंगवाडी येथील रामनाथ वारिंगे यांच्या कुटुंबाचा लाडका असलेल्या ओम्याने महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध बैलगाडा घाटांमध्ये आपल्या वेगाच्या जोरावर विजय मिळवत लौकिक निर्माण केला होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच मावळातील बैलगाडा शौकिनांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. शेकडो बैलगाडाप्रेमींच्या उपस्थितीत ओम्याला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी गाडामालक रामनाथ वारिंगे यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
मावळच्या मातीतला अभिमान म्हणून ओळख निर्माण केलेल्या ओम्याला अंत्यविधीपूर्वी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. बैलगाडा शर्यतीच्या मैदानातील त्याचा वेग, जिद्द आणि विजयाचा ठसा कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. गेल्या सुमारे नऊ वर्षांपासून ओम्याने महाराष्ट्रातील विविध बैलगाडा घाटांवर आपल्या वेगाचा दबदबा कायम ठेवला होता. त्यामुळे बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी त्याची शर्यत पाहणे हा नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला. आता मात्र लाडक्या ओम्याची वेगवान शर्यत चाहत्यांना पुन्हा पाहता येणार नाही.
ओम्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठी बक्षिसे पटकावली होती. त्याच्या नावावर दोन जेसीबी, आठ थार, १२ ट्रॅक्टर, तीन बोलेरो, १७५ दुचाकी, २५ चांदीच्या गदा आणि तब्बल १५०० हून अधिक सन्मानचिन्हे आहेत. याशिवाय त्याने बुलेट, सोन्याची बक्षिसे आणि रोख रक्कम अशीही अनेक बक्षिसे जिंकली होती. या कामगिरीमुळे त्याला ‘मावळ किंग’, ‘भारतकेसरी’, ‘महाराष्ट्र केसरी’, ‘मावळची राजधानी एक्सप्रेस’, ‘तुफान गतीचा बेताज बादशहा’ आणि ‘बैलगाडा क्षेत्राचा कोहिनूर’ अशा विविध बिरुदांनी गौरविण्यात आले होते.
ओम्याच्या लोकप्रियतेची आणि त्याच्या कामगिरीची दखल २०२४ मध्येही घेण्यात आली होती. मावळ फेस्टिव्हलमध्ये ‘बैलगाडा शर्यतीचा राजा – मावळ किंग ओम्या’ म्हणून त्याचा विशेष सत्कार करण्यात आला होता. मैदानावर मिळवलेल्या विजयांमुळे आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
ओम्याच्या निधनाने मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याने मैदानावर निर्माण केलेला वेगाचा दबदबा, त्याची जिद्द आणि त्याच्या नावावर जमा झालेले यश यामुळे तो बैलगाडाप्रेमींच्या स्मरणात कायम राहणार आहे. ओम्याच्या निधनानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत झालेला अखेरचा निरोप ओम्याची मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या विश्वातील लोकप्रियता आणि चाहत्यांच्या मनातील त्याचे स्थान अधोरेखित करणारा ठरला.