मी’ नव्हे, ‘आपण’… मानवतेला एकवटण्याचा मंत्र- डॉ. मोहनजी भागवत

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
न्यूयॉर्क,
dr. mohanji bhagwat ‘मी’ आणि ‘माझे’ या भावनेतून कोणताही प्रश्न सुटत नाही; त्याऐवजी ‘आपण’ आणि ‘आपले’ ही भावना हाच त्यावरील उपाय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. न्यूयॉर्क शहरात शनिवारी झालेल्या ‘वन वर्ल्ड : वन ह्युमॅनिटी फेथ लीडर्स’ समिटमध्ये ते बोलत होते. विविधता ही आपल्या एकतेची शोभा आहे. त्यामुळे विविधता स्वीकारणे, तिचा सन्मान करणे आणि तिचे संरक्षण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे इतरांच्या वैशिष्ट्यांचेही रक्षण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
 

dr. mohanji bhagwat 
सत्य एकच आहे आणि धर्म अनेक आहेत, असे सांगताना डॉ. मोहनजी भागवत यांनी धर्मातील शिस्त आणि कर्मकांडाच्या भूमिकेवरही भाष्य केले. आजच्या जगात धर्माचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर कर्मकांडांनी निश्चित केले जाते. मात्र, कर्मकांडांमागील शिस्तही आवश्यक आहे; कारण ही शिस्त आत्म्याला पुढे नेणारा मार्ग तयार करते आणि मानवाला दैवीत्वाकडे घेऊन जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीने प्रकाशाकडे निर्देश करणारे बोटच पाहत राहिले आणि बोटाच्या पलीकडे असलेला प्रकाश पाहिला नाही, तर त्या निर्देशाचा उद्देशच निष्फळ ठरतो, असे उदाहरण देत त्यांनी धर्माच्या अंतिम उद्देशाकडे लक्ष वेधले. धार्मिक नेत्यांनी वर्तमान परिस्थिती dr. mohanji bhagwat  लक्षात घेऊन वेळोवेळी हे शाश्वत ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे; हे काम कष्टाचे असले तरी ते करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
 
 
भारतामध्ये सर्व पंथांचे आणि संप्रदायांचे लोक राहतात, याचा उल्लेख करताना डॉ.मोहनजी भागवत यांनी भारताच्या परंपरेवर प्रकाश टाकला. जगात ज्या लोकांना सुरक्षित आश्रय मिळू शकला नाही, त्यांना भारताने आश्रय दिला आणि येथे त्यांना आपले स्थान मिळाले, अशी भारताची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. जगातील मानवजात एकच आहे, हे ज्ञान आम्हाला आहे आणि म्हणूनच विविधता असूनही संपूर्ण मानवता एक आहे, हा संदेश जगभर पोहोचवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.
 
समाजसेवेच्या माध्यमातून ही एकता प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न संघाकडून सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक समाजाच्या सहकार्याने एक लाख तीस हजार सेवा प्रकल्प चालवत आहेत. सेवा करताना कोणताही भेदभाव केला जात नाही. ज्याला गरज आहे, त्याची सेवा केली जाते आणि सर्वत्र समान भावनेने सेवा केली जाते, असे डॉ.मोहनजी भागवत यांनी सांगितले.
 
 
१९९६ मध्ये हरियाणातील दादरी येथे दोन विमानांची टक्कर झाल्याच्या घटनेचे उदाहरण डॉ. मोहनजी भागवत यांनी दिले. ही दोन्ही विमाने मुस्लिम देशांमधील होती आणि त्यातील बहुतांश प्रवासी मुस्लिम होते. या विमानांची टक्कर झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य केले. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. स्वयंसेवकांनी मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली तसेच मृतांच्या नातेवाईकांनी आल्यानंतर त्यांची ओळख पटवून देण्यासाठी मदत केली. ‘ते मुस्लिम आहेत’ असा विचार करून सेवा करण्यापासून आम्ही कधीही मागे हटत नाही, अशी भूमिका त्यांनी या प्रसंगाच्या माध्यमातून स्पष्ट केली.
 
२०१८ नंतर दिल्लीत केलेल्या आपल्या भाषणानंतर अनेकांनी प्रतिसाद दिला आणि संवादासाठी त्यांना आमंत्रित केले, असे डॉ.मोहनजी भागवत यांनी सांगितले. त्यानंतर प्रामुख्याने भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील व्यक्तींशी संवादाची प्रक्रिया सुरू झाली. टप्प्याटप्प्याने हा संवाद पुढे नेला जात आहे. संवाद हा पहिला टप्पा आहे; मात्र त्यानंतर सेवा करायची, असे नसून संवाद आणि सेवा हे दोन्ही एकाच वेळी सुरू झाले पाहिजेत. सुरुवातीपासून संघाच्या कार्यपद्धतीत हेच केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
आपल्या भाषणात त्यांनी संस्कृतमधील प्रसिद्ध श्लोकाचाही उल्लेख केला—‘रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां । नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव ॥ ७ ॥’ विविध प्रवृत्तींच्या माणसांनी स्वीकारलेले मार्ग वेगवेगळे, सरळ किंवा वाकडे दिसत असले तरी ते अखेरीस एकाच परमसत्याकडे जातात, जसे वेगवेगळ्या ठिकाणांहून उगम पावणारे प्रवाह अखेरीस समुद्रात येऊन एकत्र मिसळतात, असा या श्लोकाचा आशय असल्याचे त्यांनी मांडले.
मानवतेतील एकता केवळ राजकारणाच्या माध्यमातून साध्य होऊ शकत नाही, असे डॉ.मोहनजी भागवत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ‘राजकारण हे आता स्वहिताचा खेळ बनले आहे,’ असा अनुभव भारतातही येत असल्याचे सांगत त्यांनी समाजापासून या परिवर्तनाची सुरुवात करण्याची गरज व्यक्त केली. समाजात काम करणे आणि ते स्थानिक पातळीवरून सुरू करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
स्वार्थरहित सेवा आणि एकतेचे वातावरण निर्माण करणारी छोटी-छोटी केंद्रे किंवा ‘पॉकेट्स’ समाजात उभी केली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. संवादाची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवून त्यातून लोकांना एकमेकांशी जोडले पाहिजे आणि त्यानंतर या प्रयत्नांचा विस्तार केला पाहिजे. लोक जेव्हा अशा कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतील, तेव्हा त्यांच्यात परिवर्तन घडेल. त्यामुळे आपण ज्या जगाची कल्पना करतो, त्या जगाचे प्रारूप प्रथम आपल्या स्वतःच्या परिसरात निर्माण केले पाहिजे आणि त्यांना परस्परांशी जोडत पुढे नेले पाहिजे, असा संदेश डॉ.मोहनजी भागवत यांनी दिला.